भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
घाटनदेवी मंदिराचे पवित्र प्रांगण… सनई, चौघडी, वाजंत्री आणि मंगल वाद्यांचा निनाद… सदाबहार गीतांची रंगत..आली लग्नघटिका समीप नवरा…. सावधान …वाजंत्री सावधचित्त अशा अनेक मंगलाष्टकांची लयदार ललकारी… प्रतिष्ठित मान्यवरांचा आशीर्वाद आणि आयोजकांसह कार्यकर्त्यांची धावपळ… जेवणाची लज्जतदार मेजवानी… असा सगळा शाही सामुदायिक लग्नसोहळा पाहून वधुवरांच्या आईवडील, नातेवाईकांसह वऱ्हाडी मंडळींचे डोळे दिपले. अनेकांच्या डोळ्यात कृतार्थतेच्या भावनांनी गंगा गोदावरी दाटून आली. अशा राजेशाही विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा अभूतपूर्व आनंद सर्वांनी घेतला. हा सोहळा पाहून वधुवरांच्या आईवडिलांच्या डोळ्यांत अश्रुधारा आणि आयोजकांनाही भावना अनावर झाल्या.
अक्षयतृयीयेच्या मंगल पर्वावर जनसेवा प्रतिष्ठान व घाटनदेवी मंदिर ट्रस्ट इगतपुरी यांच्यातर्फे सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. गत दोन वर्षातील महामारीच्या परिस्थितीमूळे अनेक गरिबांचे रोजगार जाऊन शिक्षण सुद्धा थांबले. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमूळे अनेक विवाहपात्र वधू वरांचे विवाह सुद्धा थांबले होते. यामुळेच जनसेवा प्रतिष्ठान व घाटनदेवी मंदिर ट्रस्ट, इगतपुरीतर्फे आर्थिक दुर्बल, कोरोनाग्रस्त परिवारातील वधुवरांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. घाटनदेवी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न झाला. ह्या सोहळ्यात वर आणि वधूचे लग्नायोग्य वय आर्थिक दुर्बल घटक आणि कोरोनाजन्य परिस्थितीमूळे निर्माण झालेल्या परिस्थितीतील परिवारास प्राधान्य देण्यात आले. ह्या सामुदायिक सोहळ्यात वधू वरांना कन्यादानाचे भांडे, वधू व वराच्या विवाहासाठी कपडे, वधू वर यांच्या दोन्ही बाजू कडील ५०-५० नातेवाईकांचे भोजन आयोजकांतर्फे देण्यात आले. विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्य विषयक जागरूकता, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन सुद्धा करण्यात आले.
ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कु. सुनीता यशवंत मोडुळा रा. टाकी पठार ता. शहापूर जि. ठाणे हिचा विवाह कु. रवींद्र चंदर झुगरे रा. कारेगाव ता. मोखाडा जि. पालघर यांच्याशी, कु. लतिका तुकाराम धांडे रा. रामनगर ता. इगतपुरी हिचा विवाह कु. प्रदीप अर्जुन माळी रा. शेंगाळवाडी इगतपुरी यांच्याशी, कु. कीर्ती भगवान घोरपडे रा. कवडदरा ता. इगतपुरी हिचा विवाह कु. राजाराम तुकाराम काठे रा. कवडदरा ता. इगतपुरी यांच्याशी तर कु. कविता रामदास शिंदे रा. घोटी बुद्रुक ता. इगतपुरी हिचा विवाह कु. मंगेश बाळू बोंडे रा. टिटोली ता. इगतपुरी यांच्याशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, रेल्वे पोलीस निरीक्षक राकेशकुमार, पत्रकार भास्कर सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नयना गावित यांनी भाषणे केली.
महंत फलाहारी महाराज यांनी आयोजकांचे कौतुक करून असे सामुदायिक सोहळे आगामी काळात व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, विठ्ठल लंगडे, प्रशांत कडू, अनिल भोपे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, सतीश निकम, नंदलाल भागडे, हेडगेवार पतसंस्थेचे बाळासाहेब सुराणा, घोटी टॅपचे पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, अनिता घारे, हरिष चव्हाण, कृउबा संचालक तुकाराम वारघडे, रानकवी तुकाराम धांडे, मनसे नेते भोलेनाथ चव्हाण, दौलत बोंडे, आदींसह इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले. ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान आणि घाटनदेवी ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.