इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
युवकांमधील क्रीडागुण वाढवण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे. व्यायामासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्यही तेवढेच महत्वाचे असते. यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी घेतलेला पुढाकार यशस्वी झाला आहे. शिवक्रांती मित्रमंडळ वाडीवऱ्हे यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून आज व्यायामशाळेसाठी विविध साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या विशेष प्रयत्नांनी व्यायामशाळा साहित्य देण्यात आले. सध्याच्या काळात शरीर निरोगी आणि चपळ ठेवण्यासाठी व्यायाम महत्वाचा असून या साहित्यामधून सदृढ पिढीचे निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास गोरख बोडके यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, उद्योजक शामभाऊ परदेशी यांच्या हस्ते फित कापून व्यायामशाळा साहित्याचे लोकार्पण संपन्न झाले. कार्यक्रमाप्रसंगी वाडीवऱ्हे ग्रामपालिकेचे सदस्य माणिक मुतडक, मोहन चोथे, मनसे नेते आत्माराम मते, डॉ. उल्हास बोडके आदींसह शिवक्रांती मित्रमंडळ वाडीवऱ्हेचे कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. शिवक्रांती मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.