इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामनिधीचा अपहार झाला असून ग्रामसभा कोषनिधीतुन ( पेसा ) कोणतेही काम न करता गावातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे व एका मजूर संस्थेच्या नावे बॅंक खात्यातून सुमारे १० लाख रुपये काढले आहेत असा आरोप
ग्रामपंचायत सदस्या सुमन युवराज गातवे यांनी केला आहे. सदर कोषनिधीचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष मंदाबाई गणेश बेंडकोळी व सदस्य ईश्वर ऊत्तम बेंडकोळी यांच्याविरुद्ध शासनाच्या निधीचा अपहार केल्याबद्दल त्वरीत गुन्हा दाखल करावा. सदर रकमेची वसुली करण्यात यावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर १३ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीचा कोषनिधी म्हणजेच पेसा निधीच्या अध्यक्षा मंदाबाई गणेश बेंडकोळी व सदस्य ईश्वर उत्तम बेंडकोळी यांनी कोणतेही काम न करता पेसा बँक खात्यातून वेगवेगळया व्यक्तींच्या नावे धनादेशाद्वारे पैसे काढण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी मे महिन्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयास पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी चौकशी केलेली असूनही अहवाल तयार करण्यास व देण्यास टाळाटाळ करीत आहेत असे शेवटी म्हटले आहे.