इगतपुरीनामा न्युज, दि. १८
पाडळी देशमुख येथील गट नंबर ४२२ यामधील महामार्गाच्या अखत्यारीतील क्षेत्रावरील व्यापारी गाळे ४ अंतिम नोटिसा देऊन पाडण्यात येतील असे आश्वासन महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आले. . इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्गाचे अधिकारी रघुनाथ माने यांच्याशी उपोषणकर्त्यांची सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार पाडळी देशमुखच्या धांडे कुटुंबियांनी आज उपोषण मागे घेतले. राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित क्षेत्र उताऱ्यावरून वजा झाले नसूनही वादग्रस्त गट बिनशेती करण्याची प्रक्रिया सुरू असतांना व्यापारी गाळे बांधण्यात आले. या बिनशेती प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी १४ एप्रिलपासून पाडळी देशमुख येथील धांडे कुटुंब उपोषणाला बसले होते.
महामार्ग प्रशासनाचे अधिकारी रघुनाथ माने यांनी महामार्गापासून बांधकाम झालेल्या गाळ्यांचे अंतर मोजुन हे बांधकाम महामार्गाच्या हद्दीत असल्याची खात्री केली. ह्या बांधकामाबाबत जागेवर नोटीस चिटकवण्यात आली आहे. याबाबत योग्य संधी देऊन महिनाभरात बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार धांडे कुटुंबांने उपोषण मागे घेतले. संबंधित व्यक्तींनी महामार्गात गेलेले क्षेत्र उताऱ्यावरून वजा न झाल्याचा फायदा घेऊन बिनशेती प्रक्रिया सुरू असतांना ग्रामपंचायतसह अन्य कोणाचीही बांधकाम परवानगी न घेता व्यापारी गाळे बांधले. शेतकरी योगीराज धांडे यांच्या मागील बाजूच्या शेतात जाण्यासाठी नियमाप्रमाणे रस्ता ठेवला नव्हता. यामुळे न्याय मिळण्यासाठी योगीराज धांडे यांनी त्यांच्या कुटुंबासह उपोषण सुरू केले होते. महिनाभरात यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ, भाजपचे रवी गव्हाणे, पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले, सोमनाथ चारस्कर, अर्जुन शिंदे, दत्ता धोंगडे, नामदेव चौधरी, पिंटू सहाणे आदी उपस्थित होते.