नव्या गावाची उभारणी करूया विकसित गाव बनवूया
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
काही वर्षांपुर्वी अतिदुर्लक्षित आणि विनोदाचा विषय म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव ओळखले जात होते. ह्या गावात मूलभूत सुविधांच्या योजनांसह कुणाच्या स्वप्नात कधीही न आलेला शाश्वत विकास आता पाहायला मिळत आहे. गावावर कुटुंबवत्सलतेने जीवापाड प्रेम करणारा एखादा सामान्य माणूस गावकऱ्यांची मान गर्वाने उंचावू शकतो हे मोडाळे गावाच्या उदाहरणावरून दिसून येते. क्षमतेपेक्षा जास्त विकासाचे मोठे स्वप्न पाहून त्याप्रमाणे स्वप्नपूर्तीसाठी झटून काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके या माणसाने मोडाळे गावात न भूतो न भविष्यती असा खरा विकास उभा केला आहे. गावाला बदलवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि गावकऱ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी ३६५ दिवस काम करून संपूर्ण इगतपुरी तालुक्यातही कोट्यवधींची विकासकामे गोरख बोडके यांनी करून दाखवली. कोरोनाकाळात त्यांची देवतुल्य कामगिरी सर्वांच्या दृष्टिक्षेपात आहे. आता मोडाळे गावात प्राणवायू देणाऱ्या वड आणि पिंपळ ह्या वृक्षांची लागवड करण्याचे त्यांचे स्वप्न आज पूर्णत्वाकडे आहे. “नव्या गावाची उभारणी करूया विकसित मोडाळे बनवूया” यानुसार गोरख बोडके यांनी स्वखर्चाने १ लाख रुपयांची वड आणि पिंपळाची झाडे मोडाळे गावाला समर्पित केली आहेत. गोरख बोडके यांचा प्रवास आता “वृक्षमित्र” म्हणून सुरू झाला आहे.
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावाच्या विकासाचा अत्यंत मोठा प्रवास आहे. एवढा मोठा प्रवास शब्दांमध्ये मांडणे अत्यंत अवघड आहे. म्हणून हा संपूर्ण प्रवास पाहण्यासाठी एकदा तरी मोडाळे गावाला भेट द्यायला हवी. ह्या गावाचा कायापालट करणारा अवलीया म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके घराघरात जाऊन त्या त्या कुटुंबांचा हक्काचा घटक बनले आहेत. मोडाळे गावाला विकसित करताना निसर्गसंपन्न सुद्धा करायला हवे यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यासाठी आज त्यांनी प्राणवायू निर्माण करणाऱ्या उपयुक्त वड आणि पिंपळ वृक्षांची अनमोल भेट मोडाळे गावाला दिली. तब्बल १ लाख रुपये किमतीची वड आणि पिंपळाची झाडे आज गावात दाखल झाली आहेत. रुग्णमित्र ते वृक्षमित्र असा त्यांचा प्रवास आता सुरू झाला आहे अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.
वड आणि पिंपळाची भलीमोठी झाडे मोडाळे गावात इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत लावली जाणार आहेत. ही झाडे जगवण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थ जीवाचे रान करणार असून गोरख बोडके यांच्या उपक्रमासाठी आपले योगदान देणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने ह्या कार्यक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करून "निसर्गसंपन्न मोडाळे" उभे करण्यासाठी बळ देणार आहे. आगामी काळात डेरेदार वड आणि पिंपळ यांनी बहरलेले माझे गाव पाहून मला आत्मिक आनंद मिळणार असल्याची भावना गोरख बोडके यांनी व्यक्त केली.