गिन्नी गवतापासून बनणार बायो सीएनजी गॅस : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या जैवइंधन प्रकल्प कार्यालयाचे उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

नाशिक व पेठ ह्या दोन्ही तालुक्यात सुमारे दहा – दहा एकर जागेत नेपियर ग्रास अर्थात गिन्नी गवतापासून जैविक इंधन निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या कार्यालयाचा शुभारंभ देवळाली कँम्प येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ व स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नासाकाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ व एमसीएल अंतर्गत जैवइंधन निर्मिती कारखान्याचा शुभारंभ म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी दुग्धशर्करा योग आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

मीरा क्लीन फ्यूल्स लिमिटेड ( MCL ) व नाशिक ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक तालुक्यात तसेच पेठ ग्रीन फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड अंतर्गत पेठ तालुक्यामध्ये बायो सीएनजी पीएनजी व सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प साकारत आहे. सध्या देशाचा 20 टक्के खर्च बाहेरील देशातील इंधन आयात करण्यासाठी होत आहे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशात नैसर्गिक इंधन तयार करण्यासाठी जैविक तंत्रज्ञानाची संकल्पना पुढे आणली. त्या माध्यमातून नैसर्गिक इंधन निर्मितीचे प्रकल्प सुरू होत आहे. असेच प्रकल्प नाशिक तालुक्यात व पेठ तालुक्यात होत आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची संकल्पना असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुमारे 50 कोटी रुपयांचा जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प ( नैसर्गिक गॅस निर्मिती ) उभा केला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे  दोन्ही तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे आर्थिक हित साध्य होणार आहे. त्याच प्रमाणे तालुका प्रदूषणमुक्त करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबरोबरच त्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी 15 हजार शेतकऱ्यांना नाममात्र शुल्क भरून सभासद करून घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप जाधव यांनी प्रकल्पाविषयी माहिती देताना केले. यावेळी प्रकल्प सहकारी अरविंद नागरे व केदारनाथ चिमणपुरे उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी नांदगाव तालुक्याचे प्रकल्प प्रमुख गणेश पालखेडे, शिवसेना नेते कचरू पाटील डुकरे, शेतकरी संघाचे चेअरमन भाऊसाहेब शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण आडके, बाळासाहेब झनकर, विष्णुपंत गोडसे, भाजपा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, दिलीप चव्हाण, सरपंच गणेश जाधव, नारायण बेझेकर, गिरीश धुर्जड, नरेंद्र चव्हाण, डॉ. अरुण चव्हाण, भाऊसाहेब घाडगे, शांताराम रिकामे, दत्ताभाऊ जाधव, संपत जाधव, सुभाष वाजे, विठ्ठल हारक, सुभाष काठे, ॲड. संदीप गायधनी, हरिश्चंद्र बोराडे, राजू पाळदे, गणेश ठाकूर, विक्रम चौधरी, सिद्धार्थ नगरकर आदींसह नाशिक व पेठ तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप गायधनी, सुभाष काठे, दिपक गुरुळे, अंकुश जाधव, हरिश्चंद्र बोराडे, योगेश चव्हाण, कृष्णा डावखर, ज्ञानेश्‍वर गोवर्धने आदींनी परिश्रम घेतले.

थेट शेतात जाऊन मालाची खरेदी


शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या माल त्यांच्या शेतात जाऊन खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना कुठेही गवत घेऊन जाण्याची गरज नाही. त्यामुळे प्रकल्पासाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विचार करण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या इंधनाचा वाहनासाठी व घरगुती स्वयंपाकासाठी उपयोग होणार आहे. प्रकल्पाच्या एकूण नफ्यातील सुमारे 20 टक्के नफा तालुक्यातच सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे.
– गणेश पालखेडे, प्रकल्पप्रमुख नांदगाव
शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला हमीभाव नाही. त्यामुळे पिकेल ते विकेलच असे नाही. शेतीला जोड धंदा आवश्यक आहे. त्याच्या एकूण शेती पैकी किमान एक एकर क्षेत्राच्या उत्पन्नात दोन लाख वार्षिक उत्पन्न हमखास मिळणार असेल तर या प्रकल्पाचे स्वागतच केले पाहिजे.
- कचरू पाटील डुकरे, प्रगतशील शेतकरी व शिवसेना नेते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!