कसारा घाटात ४०० फुट खोल दरीत उडी मारणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश : आपत्ती व्यवस्थापन टीममुळे मिळाले जीवदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

रविवारी संध्याकाळी नवी मुंबई येथील जगदीश नाना पाटील, वय २७ ह्या तरुणाने कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोरील असलेल्या उंटदरी जवळ उभा राहुन उंच ठिकाणाहून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याला ४०० फूट खोल दरीतून सुखरुप बाहेर काढण्यास कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम, इगतपुरी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना यश आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी संध्याकाळी मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोरील उंट दरीच्या डोंगर टेकडीवर नवी मुंबई येथील जगदिश नाना पाटील हा तरुण फोटो काढण्याच्या बहाण्याने गेला. त्याने अचानक उंच डोंगरावरून दरीत उडी घेतली. तब्बल ४०० फूट खोल दरीत उडी घेतल्याचे एका रिक्षाचालकाने बघितले. या रिक्षाचालकाने तात्काळ इगतपुरी पोलिसांशी संपर्क करून घडलेल्या घटनेबद्दल त्यांना माहिती दिली. इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक हॉटेल व्यावसायिक तथा राष्ट्रवादी नेते महेश नाना शिरोळे यांना सोबत घेऊन खोल दरीत उतरुन परिस्थितीची पाहणी केली असता उडी घेतलेला तरुण जिवंत असल्याचे लक्षात आले.

दरीतील तरुणास बाहेर काढण्यासाठी त्यांनी त्वरित कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमला संपर्क करून बोलावण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज मोरे, देवा वाघ, लक्ष्मण वाघ, धर्मेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थ महेश शिरोळे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन मुकणे, सचिन बेंडकुळे, पटेकर, लोहरे, होमगार्ड यांच्या मदतीने दरीत पडलेल्या तरुणाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानतर ४०० फूट खोल दरीत पडलेल्या जखमी जगदीश पाटील याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जखमी तरुणास महामार्ग पोलीस घोटी केंद्र यांच्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जास्त मार लागला असल्याने जखमी जगदिश पाटीलला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीम, इगतपुरी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी एका तरुणास जीवदान मिळाल्याने पोलीस प्रशासनासह इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सर्वांचे आभार मानत कौतुक केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!