इगतपुरीनामा न्यूज, दि. २
राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखरावर आज नवीन वर्षाची गुढी उभारुन मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी हा अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी नववर्षाच्या प्रथम दिवशीच्या पहाटेच कळसुबाई शिखरावर जावून गुढी उभारली. याचवेळी उगवत्या सूर्याचे शिखरावरच दर्शन घेऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यात स्वागत होत आहे. २५ वर्षांपासून हा उपक्रम अखंडित सुरू असून कळसुबाई मित्रमंडळ यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. इगतपुरी तालुका अन कळसूबाईचे शिखर हे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. जीवनात एक तरी वेळेस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर जावे ही प्रत्येकाची मनोकामना असते. ह्याला घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक अपवाद असून ते नवरात्रात तर दररोज उपाशीपोटी कळसुबाईच्या शिखरावर जातात. वर्षभरातही अनेक उपक्रमांच्या माध्यमातून हे युवक नेहमीच शिखरावर जाउन खऱ्या निसर्गाचा आनंद घेतात.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली नववर्षाचे स्वागत कळसुबाईच्या शिखरावर जावून गुढी उभारुन करावे असा संकल्पच या मराठीप्रेमी युवकांनी केला होता. त्यानुसार आज पहाटे घोटी येथून बारी येथे धाव घेतली. तेथून कळसूबाईच्या शिखरावर जाऊन विधिवत देवीचे पूजन करून नववर्षाचा संकल्प केला. गुढी उभारुन उगवत्या सूर्याचे स्वागत आणि नववर्षाच्या प्रथम दिनाचे स्वागत केले. यामध्येकळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, गजानन चव्हाण, बाळासाहेब आरोटे, अशोक हेमके, निलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, नितीन भागवत, सुरेश चव्हाण, उमेश दिवाकर, बाळासाहेब वाजे, गणेश काळे, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसणे, पुरुषोत्तम बोराडे, सोमनाथ भगत, पंढरीनाथ दुर्गुडे, रमेश हेमके, रुद्रेश हेमके, रोशन लहाने, संकेत वाडेकर, चेतन जाधव, देविदास पाखरे, नगमा खलिफा, चतुर्थी तोकडे आदी गिर्यारोहक सहभागी झाले होते.कळसुबाईच्या सर्वोच्च शिखरावर जावून नव्या वर्षाच्या स्वागताची गुढी उभारण्याची संधी मिळाली. त्याचा खरा आनंद घेतला. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे गुढी उभारुन स्वागत केले जाते. गुढी उभारण्याला महत्व असून निसर्गाच्या सान्निध्यात सर्वात उंच गुढी उभारण्याचे भाग्य लाभले असे मत अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी व्यक्त केले.