घोटी सिन्नर महामार्गाच्या समृद्धी क्रॉसिंगवर धुळीचे लोट : वाहनधारकांसह परिसरातील शेतकरी वैतागले

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग अनेकांना समृद्ध करून गेला, तर अनेक परिसरातील शेतकरी व नागरिकांना त्रस्तही करून जात आहे. समृद्धी महामार्गावर पिंपळगाव मोर व धामणीजवळ घोटी-सिन्नर मार्गावर क्रॉसिंग असून काम चालू आहे. मागील काळात तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता समृद्धी कामामुळे क्रॉसिंगच्या परिसरात केलेला नसून क्रॉसिंगवरील पुलाचे काम झाल्यानंतर होणार आहे. समृद्धीचे काम सुरू असलेल्या भागांत ठेकेदार कंपनी प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निव्वळ खडी, कच टाकून सारवासारव केली जाते. कोणत्याही प्रकारचे टिकाऊ काम केले जात नसल्याने तिथला रस्ता खड्डेमय झालेला आहे. गतवर्षी ह्याच भागांत डांबरीकरण केले होते त्यामुळे रस्ता काही काळ चांगल्या स्थितीत होता. समृद्धीच्या अवजड वाहनांची वर्दळ व मार्गावरील सततच्या गर्दीने रस्त्याची पुरती वाट लागली.

समृद्धी क्रॉसिंगवरील रस्त्याबाबत कंपनीचे नेहमीचे रडगाणे असून तात्पुरती मलम पट्टी करणे हे अगदी लहान मुलांना नादी लावण्यासारखे आहे. भक्कम व टिकाऊ डांबरीकरण करून स्थानिकांसहित वाहनधारकांना दिलासा तात्काळ मिळायला हवा.

- पांडुरंग वारूंगसे, माजी उपसभापती इगतपुरी

क्रॉसिंगवरील रस्त्याच्या तुकड्यावर निव्वळ खडी टाकल्याने ३ दुचाकीस्वार घसरून पडले आहेत. शिवाय अचानक धुळीचे लोळ उठल्याने वाहनचालकांना समोर गाड्याही दिसत नाहीत, सुदैवाने अजून तरी मोठा अपघात झालेला नाही. मागे- पुढे उत्तम रस्ता असल्याने व वेगात वाहने येऊन अचानक खराब रस्त्यामुळे वाहनचालकांची भंबेरी उडत असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. धुळीच्या प्रचंड लोळांनी परिसरातील शेती पीकांवर परिणाम झालेला आहे. आधीच खरिपाच्या पीकाचे उपन्न भांडवल म्हणून रब्बी हंगामात गुंतवून पीक उभे केले आहे. पिकांच्या पानांवर धूळ जमा झाल्याने हरितकणांची क्रिया योग्य होत नाही तसेच फुलांवर धूळ बसल्याने फुल, कळी जळून जात आहे.  क्रॉसिंगवर खड्डेमय झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून दीर्घकाळ टिकाऊ काम करावे ही मागणी दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, भाविक, पर्यटक, व स्थानिक शेतकरी करत आहेत.

रस्त्याच्या धुळीने नको-नकोसे केले असून गुंतवलेले भांडवल माती मोल जाते की काय ? अशी भीती वाटतंआहे. लवकरात लवकर मार्ग काढून आम्हा शेतकऱ्यांना त्रासमुक्त करावे.
   – उत्तम काळे, त्रस्त शेतकरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!