महावितरण सामुदायिक संपावर! अधिकारी आणि कर्मचारी यांचा दोन दिवसांचा लाक्षणिक संप

वैतरणा येथील वीजनिर्मिती कार्यालयाबाहेर विद्युत अभियंता आणि कर्मचारी यांनी निदर्शने करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

समाधान कडवे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा वीज निर्मिती केंद्रातील तसेच तालुक्यातील महावितरणचे वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २८ आणि २९ असे दोन दिवस लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये महावितरण चे विविध पदांवरील उच्चपदस्थ अधिकारी, अभियंता अशा २७ संघटना तसेच १२ कंत्राटी संघटना सहभागी झाले आहेत. त्यामुळे वीजग्राहकांना चांगलाच शॉक बसणार असला तरी मागासवर्गीय संघटना आणि तांत्रिक संघटनेचे कर्मचारी या संपात सहभागी नसल्याने काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळण्याची आशा आहे. दरम्यान राज्य शासनाने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी आमचा संप हा कायदेशीर असून मेस्मा कायदा अंतर्गत कारवाई झाली तरी बेहत्तर अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.


वैतरणा येथील विज निर्मिती कार्यालयाबाहेर अभियंता आणि कर्मचारी यांनी निदर्शने करून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. महावितरणच्या तीनही कंपन्यांचे खाजगीकरण रद्द करा, केंद्र सरकारच्या विद्युत बिलाला विरोध, जलविद्युत केंद्र खाजगी उद्योजकांना देण्यास विरोध, रिक्त पदाची होणारी दिरंगाई थांबवा, तीनही कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि अभियंता यांच्या बदली धोरणावर एकतर्फी निर्णय, कंपनीतील वरिष्ठ पदावरील भरती, बदली प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप बंद करा, कंत्राटी आणि आऊट सोर्सिंग कर्मचाऱ्यांना ६० वर्षापर्यत नोकरीचे संरक्षण देणे या मागण्या संपकरी संघटनेच्या आहेत. दरम्यान अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी या संपात सहभागी असले तरी तांत्रिक कर्मचारी आणि मागासवर्गीय संघटना कर्मचारी यांनी या संपात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे संप कालावधीत ग्राहकांना फारसा त्रास होता अखंड आणि सुरळीत वीज पुरवठा होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!