रविवार विशेष : उदंड झाले इंटरनॅशनल अवॉर्ड!

नुकतीच एक ‘जाहिरात’ सोशल मीडियावर वाचण्यात आली.. खरं तर नेहमीचीच, पण आता खरंच डोक्यात जायला लागलीय, म्हणून हा लेखन प्रपंच!

खरं तर आपल्याला सगळ्यांना जाहिरात काही नवीन नाही, पण मला दिसलेली ही जाहिरात जरा वेगळी आहे! खरं तर ही एकच जाहिरात नाहीये, अशा कितीतरी जाहिराती सोशल मीडियात झळकतांना सध्या दिसत आहेत! ही जाहिरात असते पुरस्कारांची! थांबा, थांबा! तुमचा मुद्दा आला लक्षात, पुरस्काराची ‘जाहिरात’ नक्कीच असू शकते, असण्याबद्दल आक्षेप नाहीच. आक्षेप आहे तो ‘इंटरनॅशनल’ अर्थात ‘आंतरराष्ट्रीय’ शब्दावर! आता तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल मी काय म्हणतोय ते!

मला खरंच प्रश्न पडतो, गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, फार फार तर राज्य पातळीपर्यंत समजून घेऊया आपण, पण थेट आंतरराष्ट्रीय? खरंच?? अरे, तुमच्या ‘आंतरराष्ट्रीय’च्या अध्येमध्ये एक ‘राष्ट्रीय’ पातळी आहे, ती तरी लक्षात घ्या कमीत कमी! पण ही मंडळी अध्येमध्ये थांबतच नाही, थट्टेचे थेट ‘आंतरराष्ट्रीय’ टोक गाठतात! थट्टा नाहीतर काय? आंतरराष्ट्रीय शब्दाचा अर्थ तरी कळतो का रे पुरस्कारट्यांनो?

बरं हे सुद्धा एकवेळ सहन करू आपण! पण मग आंतरराष्ट्रीय स्तराचा पुरस्कार देतांना घेणारा सुद्धा त्याच पातळीवरचा नको का? पण मग असा ‘लाभार्थी’ आणायचा कुठून? मग शोध सुरू होतो गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत! कधीकधी गल्लीच्या बाहेर हे मॅटर गेलंच तर मग संभाव्य लाभार्थ्यांची संख्या वाढत जाते आणि मग सुरू होतो ‘लिलाव’! होय, लिलावच! पुरस्काराचा लिलाव! जो जास्त ‘धन’ देणार त्यालाच आम्ही ‘मान’ देणार! म्हणजे पावतीवरचा आकडा ज्याचा मोठा, त्याला पुरस्कार! अर्थात यातही एक ‘पोट’प्रकार आहे बरं! जो जास्त खर्चाची यथेच्छ पार्टी देणार, त्याला पुरस्कार! म्हणून आपण याला ‘पोट’प्रकार म्हटलंय!

अजूनही बरेच मजेशीर प्रकार असतात यात. कधीकधी आपण काहीतरी कामाच्या गडबडीत असतो, आणि ‘यांचा’ फोन येतो, अमुक तमुक पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली आहे, अभिनंदन! ‘सविस्तर’ नंतर कळवण्यात येईल! आपण मनात पुरस्काराचे मांडे खायला सुरुवात करतो, पण त्या नादात या ‘सविस्तर’ कडे दुर्लक्ष करत हुरळून जातो. कधी कधी असा फोन वगैरे येत नसतो, तुमच्या व्हाट्सअपला (हे व्हाट्सअप म्हणजे बाटलीतलं भूत आहे, एकदा बाहेर आलं की मध्ये जायचं नावच नाही! असो, त्याबद्दल नंतर कधीतरी सविस्तर बोलूच. शिवाय हे सगळं तुम्ही सध्या तरी व्हाट्सअपवरच वाचतांना दिसताय, त्यामुळे सध्या तरी त्याच्याशी पंगा नको!) तर मी काय सांगत होतो? हां, तर तुमच्या व्हाट्सअपला एक पत्र येतं, कधीकधी हे साधं पत्र नसतं, डायरेक्ट प्रमाणपत्र! त्या रंगीत संगीत पत्रात लिहिलेलं असतं, आपली निवड अमुक ढमुक तमुक पुरस्कारासाठी करण्यात आली असून लवकरच आपल्याला ‘सविस्तर’ कळवले जाईल. तोपर्यंत आपले अभिनंदन! ह्या ‘सविस्तर’चा इंगा काय आहे हे यथावकाश कळतंच आपल्याला. आणि तेंव्हा खरंच मनापासून वाटतं, नसता पुरस्कार घेतला तर बरं झालं असतं! पण सांगतो कुणाला? कारण पुरस्कार मिळाल्याची बातमी आल्यापासून ‘किडा’ सुरु होतो, तो सगळ्यांना बातमी कळल्यानंतरच थांबतो! त्यामुळे एव्हाना सगळ्यांना माहीत झालेलं असतं त्यामुळे पुरस्कार स्वीकारणं भाग पडतं! खरं तर तुम्हाला भाग पाडलं जातं या ठिकाणी!

तर ते असो! खरं म्हणजे सगळेच पुरस्कार असे नसतात. काही काही पुरस्कार हे तुमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे नक्कीच असतात. पण त्यासाठी तुम्हाला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत, तो पुरस्कार आपोआप तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येतो आणि सन्मानाने तुमची गळाभेट घेतो. चांगल्या लोकांना शोधून त्यांच्या कामाची दखल घेणारे, सन्मान करणारे अनेक लोक आहेत, संस्था आहेत. पण ते कधीच असं पुरस्कारांचं बाजारीकरण करत नाहीत. छाती गर्वाने फुगवून स्वीकारावेत असे अनेक पुरस्कार आहेत, आणि ज्यांच्या हातून पुरस्कार स्वीकारतांना सार्थक झाल्याची भावना निर्माण व्हावी असे पुरस्कार देणारे हात सुद्धा आहेत. त्यांच्या पुरस्कारांबद्दल आणि अर्थातच पुरस्कारार्थींबद्दल सुद्धा आदरानेच बोललं जातं, यापुढेही बोललं जाईल! पण या आंतरराष्ट्रीय (सॉरी सॉरी, इंटरनॅशनल!) वाल्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय हो! कुणीही यावं आणि पुरस्कार जाहीर करावेत, अगदी होलसेल भावात कुणालाही ते द्यावेत या सगळ्यातून काय साध्य होतं? नुसता भंपक, बेगडी सन्मान देणं आणि तो स्वीकारणं दोघांचंही कर्तृत्व काय हा प्रश्न जर तुमच्या पुरस्काराकडे पाहून एखाद्याला पडत असेल तर तुम्ही इंटरनॅशनलच काय, पण कोई मिल गयाचा जादू आणि पि के मधला तो परग्रहावरचा पि के या दोघांच्या हस्ते अगदी आंतरग्रह पुरस्कार जरी घेतलात तरी तुमच्या पुरस्काराला काडीइतकीही किंमत राहणार नाही! सुधरा रे!