इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
ग्रामीण भागात शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा आणि शैक्षणिक सोयी नसल्याने त्याचा दुष्परिणाम भावी पिढीवर होतो. शिक्षणाशिवाय ग्रामीण भाग उन्नत होणार नाही. यासाठी ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देणाऱ्या शाळा समृद्ध व्हायला पाहिजे. देशाला भावी आयएएस अधिकारी आणि विविध क्षेत्रांत योगदान देणारे अभ्यासू व्यक्तिमत्व लाभावेत यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके नेहमीच अग्रेसर असतात. शिक्षणामधून शाश्वत विकास साधण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांनी जुहू मुंबई येथील लायन्स क्लबतर्फे इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाच्या नव्या इमारतीसाठी गोरख बोडके यांच्या पाठपुराव्याने आर्थिक सहाय्य दिले होते.
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या अतिदुर्गम गावात विविध क्षमता धारण करणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण मिळावे, अभ्यासासाठी पूरक संदर्भ ग्रंथ मिळावेत, शारीरिक आरोग्य उत्तम राहावे आदींसह त्यांच्या उन्नतीमधून देशाचे उज्वल भविष्य घडावे असा प्रयत्न जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांचा असतो. त्यानुसार त्यांनी जुहू मुंबई येथील लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांना ज्ञानदा माध्यमिक विद्यालयासाठी साहाय्य करण्यासाठी पाठपुरावा केला. लायन्स क्लबच्या साहाय्याने उभ्या राहिलेल्या शाळेच्या देखण्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अभ्यासिकेच्या वरच्या मजल्यावरील कामाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. गोरख बोडके यांनी सामाजिक सभागृहासाठी लायन्स क्लबतर्फे निधी मिळवला असल्याने त्याही कामाचा आरंभ लवकरच होणार आहे. याप्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी, मोडाळे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.