वाल्मिक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
इगतपुरी रेल्वे स्थानकात कोविड काळापासुन बंद करण्यात आलेल्या सुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नाही त्या सर्व सुविधा पुर्वीप्रमाणेच सुरु करून मेल व एक्सप्रेस या गाड्यांना कायमस्वरूपी अधिकृत थांबा व आरक्षण सुविधा पुर्वी प्रमाणेच मिळाव्यात.प्रवाशांना त्वरित दिलासा द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वे स्थानकाचे प्रबंधक प्रेमचंद आर्या यांना निवेदन देण्यात आले. आमची मागणी मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संदीप किर्वे यांनी यावेळी दिला.
दिल्या निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे भुसावळ व मुंबई विभागाला जोडणारे महत्वाचे रेल्वे स्थानक असुन येथे सर्व गाड्यांचे परीक्षण घेत असल्याने या ठिकाणी सर्व गाड्या थांबतात. इगतपुरीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्व विपश्यना विद्यापीठ ( धम्मगिरी ) असल्याने जगभरातुन भाविक येथे साधना व मनशांतीसाठी येत असतात. इगतपुरी हे पावसाचे माहेरघर असुन जुन ते ऑक्टोबर महिन्यात देशभरातुन लाखो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. इगतपुरीत व तालुक्यात महिंद्रा, जिंदाल सारखे अनेक मोठे कारखाने असुन या रेल्वे स्थानकाचा अधिकारी व कामगार वर्गाला चांगला फायदा होत असतो. शहरातील अनेक व्यापारी वर्ग व नोकरदार वर्ग मुंबई, नाशिकला रोजंदारीसाठी प्रवास करतात, इगतपुरी रेल्वे स्थानकात आजही सर्व मेल व एक्सप्रेस थांबतात. मात्र कोविड काळापासुन मेल एक्सप्रेसला इगतपुरी रेल्वे स्थानकात व्यावसायिक थांबा नसल्याने प्रवाशांना नाशिकरोडकडे जाण्यासाठी कल्याणहुन आरक्षण व मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोडहुन आरक्षण करावे लागत असल्याने याचा आर्थिक फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे शहरातील प्रवाशी, नोकरदार वर्ग, व्यापारी वर्ग यांना खुप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असुन गैरसोय होत आहे. आमच्या मागण्यांचा गांभीर्यपुर्वक विचार करून लवकरात लवकर सर्व मेल एक्सप्रेस यांना व्यावसायिक थांबा व आरक्षण सुविधा त्वरीत मिळाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वोतोपरी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
याप्रसंगी मनसेचे उप जिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष शत्रुघ्न भागडे, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, जेष्ठ नेते डॉ. युनुस रंगरेज, इगतपुरी शहराध्यक्ष राज जावरे, रेल्वे युनिटचे दिलीप लहाने, सचिव ॲड. दिलीप लहाने, समीर शेख, गौरव सोनवणे, सोपान कदम, सोपान भागडे, सचिन भागडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व रेल्वे युनियनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.