इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यातील वैतरणानगर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. १० वर्षांपासून कंत्राटी कामाठी म्हणून मानधनावर काम करणाऱ्या कडुन आदेश काढून देण्यासाठी आणि वेतन काढून देण्यासाठी लाच मागण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस नाईक अजय गरुड, किरण आहिरराव, एकनाथ बाविस्कर, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी हा सापळा यशस्वी केला.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील आदिवासी विकास विभागाची वैतरणानगर येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. ह्या शाळेत तक्रारदार गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी कामाठी म्हणून मानधनावर काम करतात. 16 नोव्हें 21 ते दि 11 जाने 22 पर्यंत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नासिक येथील आदेश काढून आणून देण्यासह वरील कालावधीचे वेतन काढून दिल्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटील वय ५२ याने १० हजारांची लाच ११ मार्चला मागितली होती. याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी आज सापळा रचला. मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटील याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही 10 हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ माणिकलाल रोहिदास पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.