इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील कुर्णोली येथील बालकांचे भोजन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेत त्यांच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका लक्ष्मी चेतन जोशी यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, सहाय्यक बालविकास प्रकल्पाधिकारी वंदना सोनवणे यांच्या हस्ते मुंढेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान झाला. समर्थ आणि सशक्त समाज घडवण्यात महत्त्वाचं अंगणवाडी सेविका लक्ष्मी जोशी यांचे योगदान आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार स्त्रीशक्तीचा सत्कार आहे असे उदगार सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे यांनी यावेळी काढले.
ह्या कार्यक्रमात इगतपुरी तालुक्यातील विविध अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही सन्मानपत्र देण्यात आले. पर्यवेक्षिका मंगला जडे, कुर्णोलीचे ग्रामसेवक संतोष बैरागी, उपसरपंच गुरुनाथ जोशी, सरपंच शालुबाई तेलम, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणिस सखाराम जोशी, टिटोली सरपंच अनिल भोपे यांनी लक्ष्मी जोशी यांचे अभिनंदन केले आहे. ह्या पुरस्काराने कामाला हुरूप येईल असे लक्ष्मी जोशी म्हणाल्या.