शेगाव येथे १२ मार्चला द्वितीय नाभिक साहित्य संमेलन : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या वतीने नाभिक समाजाचे एक दिवसीय द्वितीय साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील विघ्नहर्ता हॉल मध्ये १२ मार्चला होणार आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यस्थानी पुणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉ. प्रदीप कदम असतील. ते अमरावती येथे झालेल्या पहिल्या नाभिक साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष गोपालकृष्ण मांडवकर यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सुत्रे स्विकारतील. सातारा येथील सुप्रसिद्ध लेखक, कादंबरीकार आणि व्याख्याते कॅप्टन महेश गायकवाड हे या संमेलनाचे उदघाटन करतील. नाभिक समाजातील साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या ‘विशेष स्मरणिके’चे विमोचन या संमेलनात होईल. समाजातील लेखक आणि कवींच्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात येईल.

नाभिक ‘समाजाची संस्कृती, समस्या आणि भविष्याच्या वाटचाली’वर चर्चा अपेक्षित असणाऱ्या या संमेलनात समाजाला दिशादर्शक ठरलेले आंतरराष्ट्रीय हेअर डिझायनर उदय टके, स्पर्धा परिक्षा पुस्तकांचे यशस्वी लेखक ‘के सागर’, सामाजिक कार्यकर्त्या सुमन पवार, अलिबागचे सुप्रसिद्ध हेअर डिझायनर सुशील भोसले, अहमदनगरचे अशोक औटी, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक समाजाचे भालचंद्र गोरे, क्रांतीकारक विचारांचे कार्यकर्ते गोविंद दळवी, सुधाकर सनंसे, अखिल भारतीय सेन समाजाचे पुखराज राठोड, नाशिकचे समाधान निकम, नाभिक समाजातील जळगावचे प्रथम आयएएस सौरभ सोनवणे, वऱ्हाडी शब्दकोशकार शिवलिंग काटेकर, नागपूरच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक रिता धांडेकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल.

१२ मार्चला सकाळी ९ वाजता प्रतिनिधींची नोंदणी होईल. १० वाजता संमेलनाचे उदघाटन होईल. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार व स्मरणिकेचे विमोचन होईल. दुपारी साडेबारा वाजता ‘नाभिकांच्या जीवनातील नव्या विकास वाटा साहित्यातून विस्तारल्या जाव्यात’, या विषयावरील प्रा. यशवंत घुमे यांच्या अध्यक्षतेखालील परिसंवादात पुण्याचे चंद्रशेखर जगताप, सोलापूरचे दत्ता पारपल्लीवार, वर्धेच्या अर्चना धानोरकर सहभागी होतील. दीड वाजता श्रीधर राजनकर व नितेश राऊत यांचे कथाकथन होईल. अडीच वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. संध्याकाळी ४ वाजता बक्षीस वितरण, साडेचारला संमेलनाचा समारोप होईल. पुण्याचे मारूती यादव यांची हास्यजत्रा ५ वाजता सादर होईल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. शेगावची स्थानिक आयोजन समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. या संमेलनाला राज्यभरातील समाजबांधवांनी उपस्थित राहून साहित्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक कलादर्पण संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!