प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४- मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षी गणेशजयंतीनिमित्त उद्या बुधवारी जानेवारीला गणेश जयंती उत्सव सोहळा आणि यात्रा महोत्सव होणार आहे. सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी याबाबत माहिती दिली. उद्या पहाटे ६ वाजेपासून महागणेश याग, महायज्ञ व महापुजा, दुपारी १ वाजता श्रींची पाडळी देशमुख गावातुन सवाद्य मिरवणुक व
पालखी सोहळा होणार आहे. दुपारी १२ वाजेनंतर दिवसभर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ ते ८ पर्यंत गणेश भक्तांसाठी भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर रात्री आठ वाजता श्री ची महाआरती आणि लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी या यात्रामहोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले असुन मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले केले आहे. येथे वर्षभरही भाविकांची गर्दी असते. गणेशोत्सव किंवा गणेशजयंती जवळ आल्यापासून याठिकाणी यात्रेचे स्वरूप येते. जवळच रेल्वे स्टेशन व महामार्ग, निसर्गरम्य वातावरण या सर्व सोयींनी या मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे. गुगल मॅपवरही देशभरातील सुमारे ६० हजारावर भाविकांनी भेटी दिल्या आहेत.