इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
जनसेवेची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडात राज्यात व जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा जागर लोककलेच्या माध्यमातून आजपासून सुरू झाला आहे. आज सकाळी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने नाशिक शहरातील कालिदास नाट्य मंदिरासमोरील वाहनतळाच्या मैदानातून या मोहिमेची सुरूवात इगतपुरी तालुक्यातील आनंद तरंग फाउंडेशने केलेल्या कार्यक्रमाने झाली. जिल्हाभर सुरू झालेल्या या लोककलावंतांच्या सादरीकरणाने जिल्ह्यातील गर्दीची ठिकाणे गजबजून गेली आहेत. आजपासून जिल्हाभरात तीन लोककलापथकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीच्या दोन वर्षपूर्ती निमित्त तीन संस्था, 30 कलावंत जिल्ह्यातील 15 तालुक्यांत रोज 5 कार्यक्रम सादर करणार असून 5 दिवसांच्या कालावधीत 63 गर्दीच्या ठिकाणांवर हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
आज आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे ता. इगतपुरी यांच्या माध्यमातून नाशिक शहर व तालुक्यातील कालिदास कलामंदिरासमोर (नाशिक), गंगाघाटावरील बाजार, सातपूर गाव बाजारपेठ, मखमलाबाद बसस्टँड व निमाणी बसस्टँड या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यात आले. नटराज लोककला अकादमी, इगतपुरी यांच्या माध्यमातून मालेगाव शहर व तालुक्यातील महापालिकेचे कॉलेज मैदान, मालेगाव बस स्टँड, दाभाडी, वजीरखेडे व काष्टी या ठिकाणी लोककलावंतांनी महाविकास आघाडीचा जागर केला.चाणक्य कलामंच कलापथक नाशिक यांच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील ग्रामीण आरोग्य केंद्र, कोहर बाजारपेठ, करंजाळी व जोगमोडी या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. आज सुरू झालेल्या या मोहिमेची सुरूवात जिल्ह्यातील नाशिक, पेठ व मालेगाव या तीन ठिकाणी एकाच वेळी करण्यात आली. नाशिक शहरात कालिदास कलामंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांच्या वतीने जिल्ह्यातील उर्वरित दोन पथकांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांचे फेसबुकद्वारे लाईव्ह प्रसारण केले जात असून लोकांना हे कार्यक्रम ऑनलाईन पाहण्यासही उपलब्ध आहेत.