इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलला केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या निती आयोगाकडून अटल टिंकरींग लॅब देण्यात आली. ही लॅब सद्यस्थितीत प्रचलित असणाऱ्या मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स या संकल्पनेवर आधारीत आहे. लॅबच्या मंजूरीसाठी शाळेसह नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाकडून सतत दोन वर्षे निती आयोगाकडे पाठपुरावा सुरू होता. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, नवोक्रमशीलता, तार्किकविचार शक्ती यांचा विकास होईल. त्यातून नवनवीन आविष्कार जन्मास आणणे असा मुख्य उद्देश निती आयोगाच्या या उपक्रमाचा आहे. इगतपुरी सारख्या दुर्गम तालूक्यातील ही पहिलीच लॅब शाळेस प्राप्त झालेली आहे. अशा या अनोख्या लॅबचे उदघाटन राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल यांच्या हस्ते करण्यात आले.
इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये केंद्र सरकारच्या निती आयोगाकडून मंजूर झालेल्या अटल टिंकरींग लॅब मधील इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटीक्सचे शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रात्याक्षिक पाहून शाळा समिती अध्यक्ष हेमंत सुराणा अचंबित झाले. अध्यक्ष राजेंद्र कलाल उदघाटन प्रसंगी स्वामी विवेकानंद यांचे जीवन प्रसंग व इंग्रजीतील विविध प्रश्नांमधून वैज्ञानिक कुतूहल सतत जागृत कसे ठेवावे याबाबत त्यांनी सांगितले. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव अश्विनीकुमार येवला, संस्थेचे सदस्य व कार्यकारी मंडळाचे सदस्य मिलिंद कचोळे, नूतन मराठी शाळेचे शाळा समिती अध्यक्ष अशोकशेठ नावंदर आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य अनिल पवार, नूतन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तुसे, उपमुख्याध्यापक केशव पाटील, पर्यवेक्षक संजय चव्हाण उपस्थित होते.
अध्यक्षस्थान शाळा समिती अध्यक्ष हेमंत सुराणा यांनी भूषवले. याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष दुलीचंद कुमावत यांनी शाळेला ऍक्वा गार्ड भेट दिले. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कलाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य अनिल पवार यांनी केले, उपस्थितांचा परिचय उपमुख्याध्यापक केशव पाटील यांनी तर पर्यवेक्षक संजय चव्हाण यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अविनाश कुलकर्णी यांनी केले. प्रशिक्षण देण्यासाठी आलेले शुभांशू सिसोदिया, संदीप आढाव व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षणादरम्यान सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी We are Innovators असा नारा देऊन नाविन्याच्या प्रवासाची मुहूर्तमूढ करण्यात आली.