इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – विकासाचा वर्षानुवर्षाचा अनुशेष भरून काढणारे गाव म्हणून मला मोडाळे या गावाबाबत समजल्यापासून येथे येण्यासाठी मी उत्सुक होते. आज ह्या गावातील राजकारण विरहित विकास पाहून धन्यता वाटते आहे. दुर्गम भागातील टूमदार मोडाळे गावाचे बदललेले रुपडे पाहून अन्य गावांनीही शाश्वत विकासाचा मार्ग धरावा असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या अखंड प्रयत्नांचे कौतुक करून आगामी काळात विकासात्मक कामांसाठी गावकऱ्यांच्या कायम सोबत असल्याचा त्यांनी शब्द दिला. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव या गावांसाठी स्वतंत्र असणाऱ्या मोडाळे पोस्ट कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या मनोगत व्यक्त करतांना बोलत होत्या.
मोडाळे येथील स्वतंत्र पोस्ट कार्यालय निर्मितीचे श्रेय जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांना असल्याचे कौतुक कार्यक्रमाचे अध्यक्ष इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त विविध महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, गारगोटी संग्रहालयाचे संचालक के. सी. पांडे, टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदी प्रमुख अतिथी हजर होते. कार्यक्रमावेळी मोडाळे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि ग्रामसेवक उपस्थित होते.