
इगतपुरीनामा न्यूज, दि. १
आपली संस्कृती, अस्मिता, इतिहास यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपल्या भाषेचे जतन होणे आवश्यक आहे. मराठी भाषेला समृद्ध परंपरा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, डॉ. आर. डी. शिंदे, डॉ. मोहन कांबळे, प्रा. व्ही. डी. दामले, प्रा. ए. एस. पाटील, प्रा. एम. जी. जोशी, दिलीप डावखर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की , मराठीला मानाचे स्थान शिवाजी महाराजांनी मिळवून दिले असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जुन्या ग्रंथांचे जतन होणे आवश्यक आहे. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी , डॉ. आर. डी. शिंदे यांचीही भाषणे झाली. काव्यवाचन कार्यक्रमात भाग्यश्री गायकर, रोहिणी चौधरी, गायत्री शिंगोटे, कविता तारडे, दिक्षा डावखर, गायत्री खातळे, जगदीश गोवर्धने, दीपाली भटाटे, दीपाली दिघे, प्रियंका गिळंदे, सावित्रा तारडे, वैभव शिंदे, अपूर्वा पाटील, मयुरी चव्हाण, मंदा दुभाषे या विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. प्रास्ताविक प्रा. ए. एस. पाटील यांनी तर आभार प्रा. एम. जी. जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.