इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात ‘विद्यार्थी कल्याण मंडळ’ आयोजित “निर्भय कन्या अभियान” एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. उदघाटन प्रसंगी डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य डी. एन. गिरी, ॲड. विजयमाला वाजे, योगिता चौधरी, कल्पना जगताप, डॉ. डी.डी लोखंडे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य भाबड यांनी विद्यार्थिनींनी भयमुक्त व स्वतःला निर्भय बनवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची जाणिव, आचरणा दैनंदिन जीवनात उतरविणे, सभोवतालच्या परिस्थितीचे भान ठेऊन निर्भयपणे जीवन जगतांना जीवनामध्ये चांगल्या मूल्यांचा अंगीकार करून चांगलं जीवन, जीवनशैली अंगीकारणे हे उद्दिष्ट असले पाहिजे असे सांगितले.
या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या ॲड. विजयमाला वाजे यांनी कौटुंबिक हिंसाचार अत्याचार, कायद्याचे संरक्षण, मुलींनी आपले संरक्षण कसे करावे, वेळप्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, बौद्धिक व शारीरिक चातुर्य कशा प्रकारे वापरले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या घटनांमधून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारची कायदेविषयक बांधणी असणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या. योगिता चौधरी यांनी आरोग्यविषयक संवाद साधला. दैनंदिन जीवनात मन आणि आरोग्य चांगलं ठेवायचा असेल तर शारीरिक सुदृढता आणि मानसिक सुदृढता असणे गरजेचे आहे. त्यासाठी सकस आहार योग्य प्रकारचा शारीरिक व्यायाम करावा असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी इगतपुरी पोलीस स्टेशनच्या कल्पना जगताप उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मोहन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन आर. आर. जगताप यांनी तर आभार जे. आर. भोर यांनी केले. यावेळी असंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.