इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
छत्रपती शिवरायांना केवळ डोक्यावर न घेता त्यांच्या विचारांना डोक्यात घेण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील टिटोली गावात नेहमीच कृतीयुक्त कार्यक्रम होत असतात. त्यानुसार दरवर्षी शिवजन्मोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोली शाळेत केले जाते. यानिमित्ताने ह्या शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम घेतले जातात. ह्यावर्षी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा टिटोलीचे सरपंच अनिल भोपे पदरमोड करून सर्व विद्यार्थ्यांना “पावनखिंड” चित्रपट पाहण्याची संधी दिली. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना अशा आगळ्या वेगळ्या प्रकारची ऐतिहासिक अनुभुती देणारी टिटोली शाळा जिल्ह्यात एकमेव ठरली आहे.
नाशिकला पावनखिंड चित्रपट पाहण्यासाठी ५ वी ते ७ वी इयत्तेतील १०० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे नेण्यात आले. शिवरायांच्या पन्हाळगडावरील वेढा याबाबतची प्रत्यक्ष चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी ऐतिहासीक अनुभुती घेतली. यानिमित्ताने सिटी सेंटर मॉलची विद्यार्थ्यांकडून भ्रमंती करण्यात आली. कु. गौरी मंगलदास बोंडे हिचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. मुख्याध्यापिका मंगला शार्दुल यांनी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यासाठी मौलिक साहाय्य करणारे सरपंच अनिल भोपे यांचे आभार मानले. याप्रसंगी ग्रामसेवक श्रीमती गोसावी, तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे, राजकुमार गुंजाळ, मंगला धोंडगे, प्रतिभा सोनवणे, योगिता पवार उपस्थित होते. कोविड संदर्भात सर्व नियमावलीचे पालन विद्यार्थी आणि शिक्षकांनी करून स्वयंशिस्त पाळली.
पावनखिंड चित्रपट दाखवण्याच्या कामाला सरपंच अनिल भोपे यांच्यासह स्वप्नील रेडकर, धनंजय पोरजे, ज्ञानेश्वर लहाने, किथ परेरा आणि हेमंत मोरे यांनी बहुमोल साहाय्य केले. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि प्रेरणादायी शिकवण देण्यासाठी ह्या चित्रपटाचा फायदा होणार आहे. टिटोली ग्रामस्थांनी सर्व मान्यवरांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.