इगतपुरीनामा न्यूज, दि. 19
ग्रामपंचायत वाडीवऱ्हे येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इगतपुरी तालुका संपर्क अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली, सार्वजनिक शौचालय उदघाटन, वैयक्तिक शौचालय भेटी, शाळेची शौचालय पाहणी, जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रन, पथनाट्य, नृत्य, चित्रकला स्पर्धा आदी विविध उपक्रम संपन्न झाले. ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे यांनी कार्यक्रमांचे उत्तम व्यवस्थापन करून कार्यक्रम यशस्वी केला.
सार्वजनिक स्वच्छतागृहाचे उदघाटन सरपंच रोहिदास शंकर कातोरे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी केले. शाळेतील मुलांच्या लेझीमद्वारे शाळेच्या आवारात मुलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे उदघाटन झाले. यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली. उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. यावेळी स्वच्छता रॅली व स्वच्छता रन काढण्यात आले. याप्रसंगी इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदुरकर, बालविकास पर्यवेक्षिका चित्रा कुलट, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.