
इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी मोडाळे येथील मोहन गोऱ्हे यांचे मळ्यातील घर आगीने संपूर्ण भस्मसात झाले. मोहन गोऱ्हे, पत्नी कमल गोऱ्हे या शेतात कामानिमित्त तर मुले शाळेत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गोऱ्हे कुटुंबांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. शॉर्टसर्किटमुळे घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे सर्वच जळून खाक झाल्याने गोऱ्हे कुटुंबीय सध्या रस्त्यावर आले आहे. या पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत व्हावी यासाठी अनेक राजकीय मंडळींनी पुढाकार घेतला. मात्र अंगावरच्या कपड्यांवर असलेले गोऱ्हे कुटुंबीय यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी गोऱ्हे यांना घर बांधून देण्याचा शब्द दिला. अशोक आहेर, संदिप बोडके यांनी सोशल मीडियाद्वारे मदत निधी उभारून तात्काळ गोऱ्हे कुटुंबीयांना घरगुती साहित्यासाठी पुढाकार घेऊन साहित्य खरेदी करून दिले. यामध्ये विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला. गोऱ्हे यांना घरासाठी नवीन पत्रे, घरातली सर्व किराणा माल, मुलांना शालेय साहित्य आणि इतर मदत केली
यावेळी रघुनाथ बोडके,अनिल गोऱ्हे, कचरू गोऱ्हे, विकास शेंडगे, गुलाब आहेर आणि मित्रमंडळ हजर होते.