दीपक भदाणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
आरटीई बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमान्वये २००९ नुसार खाजगी विनानुदानित, कायम विनानुदानित, स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ५ मार्च पर्यंत पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावे असे आवाहन इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांनी केले आहे.
२५ टक्के आरक्षणांतर्गत इगतपुरी तालुक्यातील पहिलीच्या वर्गासाठी १७ शाळांमध्ये १२६ जागांसाठी मोफत प्रवेशाची संधी मिळणार आहे. शासनाच्या या निकषांमुळे इगतपुरी तालुक्यात १७ शाळांमध्ये मोफत प्रवेशाची संधी आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या पालकांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चिती करून घेणे गरजेचे आहे. एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतिक्षा यादी राहणार आहे. पालकांना निवासाचा पुरावा, पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जातप्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
ह्या शाळांमध्ये मिळेल प्रवेश
अभिनव बालविकास मंदिर इगतपुरी ( मराठी माध्यम ४ जागा ), असीमा बाल शैक्षणिक केंद्र आवळखेड ( मराठी माध्यम १३ ), लिटील ब्लॉसम इंग्लिश मिडीयम स्कूल ( १८ ), पंचवटी इंग्लिश मिडीयम स्कूल टाकेघोटी ( ७ ), नित्यानंद इंग्लिश मिडीयम स्कूल घोटी बु (१० ),आर्य चाणक्य इंग्लिश मिडीयम स्कूल घोटी बु ( १२ ), आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल घोटी बु ( ९ ), आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल घोटी बु. ( १ )
चाणक्य इंग्लिश मिडीयम स्कूल साकूर ( ३ ), प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल कवडदरा ( ९ ), श्री सरस्वती इंग्लिश मेमिडीयमडियम स्कूल भरवीर बु. ( ४ ), फिनिक्स अकॅडमी मुंढेगाव ( ९ ), राजलक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल गोंदे दुमाला ( १० ), ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे ( ५ ),
सिद्धकला इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे ( १ ),एंजल इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे ( ४ ), स्पिडवेल एज्युस्पोर्ट्स स्कूल वाडीवऱ्हे ( ७ )
योग्य त्या कागदपत्रासह पालकांनी www.rte25%admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांनी केले आहे. प्रत्येक पात्र शाळेत मदत केंद्र सुरु आहेत. पालकांनी मदत केंद्रावरून नोंदणी करावी. त्यामुळे एकच अर्ज अचूक नोंदवला जाईल. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास परिपत्रकाप्रमाणे अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अर्ज भरताना पालकांनी दक्षता घ्यावी.
तरी याबाबत जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन गट शिक्षणाधिकारी राजेश तायडे यांनी कळविले आहे. पालकांना मार्गदर्शनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पंचायत समिती शिक्षण विभाग यांना संपर्क साधावा असे शिक्षण विस्ताराधिकारी अशोक मुंढे यांनी कळविले आहे.