
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख येथील गोडाऊनच्या जवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने प्रतिकार केल्याने बिबट्याने ठेथुन धूम ठोकली. आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या घटनेने नागरिकांत घबराट पसरली आहे. वर्दळीच्या महामार्गावर बिबट्याचा महिलेवर हल्ला झाल्याने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना या घटनेबाबत समजताच ते समयसुचकतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सुरेखा अशोक विभुते वय 30, शांताबाई शिवाजी रेपुकर वय ४० दोघी रा. म्हाडा घरकुल मुंबई नाका नाशिक ह्या दोघी आज पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान पाडळी देशमुखच्या महामार्गावरील एका गोडाऊनजवळ भंगार गोळा करण्यासाठी आल्या होत्या. याचवेळी सुरेखा अशोक विभुते हिच्यावर बिबट्याने झडप घातली. तिच्यावर जोरात हल्ला केला. सोबत असलेली शांताबाई हिने बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करून सुरेखा हिला सोडवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तिच्या प्रतिकारामुळे गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुरेखा हिला टाकून बिबट्या पळून गेला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमी महिलेला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.