गोखले एज्युकेशन सोसायटीचा १०४ वा वर्धापन दिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 19

नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी चा १०४ वा वर्धापन दिन आज ऑनलाईन पद्धतीने अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. नामदार गोखल्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतिदिनी स्थापन झालेल्या ह्या संस्थेने समाजातील सर्व स्तरांपर्यत शिक्षण सुविधा उपलब्य करून दिल्या आहेत. नामदार गोखल्यांच्या विचारांना शिक्षणाला नैतिकचे अधिष्ठान देऊन प्रत्यक्षात आणले आहे. १०४ वर्षाच्या ह्या दीर्घ प्रवासात संस्थेने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे.
कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमाळकर विशेष अतिथी होते. तर प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख होत्या. समाजातील शिक्षण, कला, साहित्य, समाज सेवा क्षेत्रातील महान दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांनी केले. त्यांनी संस्थेच्या अमूल्य शैक्षणिक कार्याची माहिती दिली. प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. ह्याप्रसंगी डॉ. स्नेहलता देशमुख ह्यांना सर डॉ. मो. स गोसावी एक्सलन्स ॲवार्ड व गोखले एज्युकेशन सोसायटीची सन्माननीय फेलोशिप देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेतर्फे त्यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन संस्थेचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी ह्यांनी केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी डॉ. मो. स. गोसावी ह्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. संस्थेच्या शैक्षणिक योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेचा गरजुंसाठी विनियोग करण्याचा मनोदय व्यक्त केला. विशेष अतिथी डॉ. नितीन करमाळकर ह्यांनी आपल्या भाषणात शिक्षण क्षेत्रातील नवनवीन विद्याशाखांचा उल्लेख केला. त्याचे महत्व अधोरेखित केले. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बद्दल विचार व्यक्त केले.

संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांना ॲचिव्हर्स ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. एल. पी. शर्मा, डॉ. कल्याणी नाजरे डॉ. प्रकाश सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे परेश सांगवीकर, मैथिली लाखे, शालेय स्तरावर रामनाथ जाधव, कादरी जावेद ह्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाले. प्रिया सोनवणी ह्यांना शिक्षक उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने सुरेंद्र जोशी व सायली आडिवरेकर ह्यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार संस्थेच्या डॉ. एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेजला मिळाला तर उत्कृष्ट वार्षिक अंकाचा पुरस्कार एचएएल महाविद्यालयाच्या कोसायको ह्या अंकाला मिळाला. ह्या वेळी स्वयंप्रकाश, स्पेक्ट्रम, विधि संधान व स्वस्तिदा ह्या विविध अंकांचे ही प्रकाशन झाले. अध्यक्षीय भाषणात सर डॉ मो. स. गोसावी यांनी नवीन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणी बद्दल आपल्या योजना स्पष्ट केल्या. संस्थेच्या एचपीटी महाविद्यालयाच्या २०२४ साली होणाऱ्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सुरु केलेल्या सर्व विद्या शाखांच्या संशोधन केंद्राबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी ह्यांनी केले. ह्या ऑनलाइन पध्दतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!