
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत इगतपुरी येथील नाशिप्र संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शनपर शिबिर पार पडले. यामध्ये तीन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. विजयमाला वाजे यांनी महिलांच्या विविध हक्कासंबंधी व्याख्यानात सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या व्याख्यानात डॉ. काजल परदेशी यांनी विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यासंबंधी माहिती दिली. प्रत्येक मुलीने आपले मानसिक आरोग्य कसे जपावे यासंबंधी मार्गदर्शन केले. तिसऱ्या व्याख्यानात आयडीयल तायक्वांदो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक विशाल जगताप, सहप्रशिक्षक संध्या भटाटे, मिना जगताप यांनी विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यात येणारा कोणताही प्रसंग येताच त्याला सामोरे जाण्याची क्षमता स्वतःत असावी असे सांगितले. त्यांनी आत्मरक्षणासाठी कराटेच्या विविध पद्धती शिकवून आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या प्रतिभा हिरे यांनी सांगितले की, विद्यार्थिनींनी सर्वच बाबतीत सक्षम असले पाहिजे. अनेक क्षेत्रात उच्च स्थानी असायला हवे. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. शशिकांत सांगळे यांनी प्रास्ताविकात निर्भय कन्या अभियानाची उद्दिष्टे सांगितली. सूत्रसंचालन प्रा. जे. एल. सोनवणे यांनी केले. यावेळी महाविद्यालय समन्वयक बी. एच. घुटे, छाया शिंदे, काजल ढिकले, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.