
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे अतिशय सन्मानाच्या दिल्या जाणाऱ्या “गोदावरी गौरव” पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते फोडसेवाडी येथील “वाघिण” सीताबाई घारे यांना गोदावरी गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. पुढील महिन्याच्या १० तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार्थींमध्ये विविध क्षेत्रातील तुल्यबळ व्यक्तिमत्त्वांचा समावेश असून सीताबाई घारे यांचे इगतपुरी तालुक्यात कौतुक होत आहे. इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपरिमंडल अधिकारी पोपट डांगे, वनरक्षक एम. बी. धादवड, विठ्ठल गावंडे, रुपाली गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इगतपुरी तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.
मागील वर्षी २१ ऑक्टोबरला इगतपुरी तालुक्यातील फोडसेवाडी येथील ६ वर्षाच्या कार्तिक घारे ह्या बालकाला बिबट्याने जबड्यात पकडून नेले. सीताबाई घारे ह्या मातेच्या देखत हा भयानक प्रकार घडला होता. धावत पळत मुलाची आई सीताबाई घारे यांनी बिबट्याचा मागे जाऊन पाठलाग केला. बिबट्यावर झेप घेऊन त्यांनी कार्तिक घारे या त्यांचौ मुलाला वाचवले होते. ही घटना अतिशय हिमतीने घडली. मुलाला वाचवणाऱ्या सीताबाई घारे ह्या हिरकणीस्वरूप मातेचे जिल्हाभर कौतुक करण्यात आले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार घोषित झाल्यानंतर सीताबाई घारे यांचे विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.