
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकानेच शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे काल शुक्रवारी समोर आले आहे. घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच रात्रीच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आले आले आहे. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकेद बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात ह्या संतापजनक घटनेने खळबळ माजली आहे. ह्या घटनेच्या निषेधार्थ टाकेद बुद्रुक भागात आज निषेध आंदोलने होणार असल्याचे समजते. दरम्यान राज्याचे शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे हे कालपासून इगतपुरी शहरात नियोजित दौऱ्यानुसार उपस्थित आहेत. ते इगतपुरी तालुक्यात उपस्थित असतांना ही घटना घडल्याने त्यांच्या भूमिकेची लोकांना प्रतीक्षा आहे., या घटनेची गंभीरपणे दखल घेत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दोन्ही आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. यानुसार कार्यवाही करत शिक्षक व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही नाशिकचे पोलिस अधिक्षकांना मंत्री भुसे यांनी दिले आहेत
इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत सहावीत शिकणाऱ्या तेरा वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार केला. वर्गशिक्षक गोरख जोशी याने तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीडित मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांने अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी युद्धपातळीवर दखल घेऊन मुख्याध्यापक तुकाराम साबळे, वर्गशिक्षक गोरख जोशी ह्या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरु केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कौटे आणि पथक तपास करीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. ह्या घटनेने इगतपुरी तालुक्यात संतापाची लाट पसरत आहे. ( ही बातमी कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. )