इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
गावाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार व्हावी, उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या कुटुंबासह गावाचे नाव सर्वदूर पोहोचवावे, निकोप स्पर्धेद्वारे इतरांना प्रेरणा मिळावी. आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर नावलौकिक वाढवावा यासाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावाने अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह मोडाळे ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात कौतुक करण्यात येत आहे. दरवर्षी इयत्ता दहावीमध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोडाळेकरांनी घेतला आहे. यामुळे आपल्या पालकांच्या हस्ते ध्वजवंदन व्हावे यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा सन्मान एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अथवा गावातुन सैन्यात दाखल होणाऱ्यांना देण्यात येणार आहे. सन्मान मिळालेले व्यक्ती उपस्थित नसल्यास त्यांच्या कुटुंबियांना हा सन्मान बहाल करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येणार असून यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
शैक्षणिक प्रगतीच्या जोरावर गावातील मानाचा सन्मान मिळावा यासाठी विद्यार्थी झपाटून काम करतील. गरिबीच्या अवस्थेत शिक्षण देणाऱ्या आईवडिलांच्या सन्मानासाठी विद्यार्थी झपाटून काम करतील. यामुळे मोडाळे गावाच्या नावलौकिकामध्ये भर पडेल. माझ्या गावकऱ्यांनी माझ्या सूचनेचा आदर केल्याबद्धल आभार मानतो. या निर्णयाचा फायदा गावाच्या कल्याणासाठी होईल ह्यात शंका नसावी.
- गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे हे आगळेवेगळे गाव असून अनोखे निर्णय आणि विकासाचे रोल मॉडेल म्हणून सगळीकडे ओळखले जाते. दरवर्षी राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, विविध संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी झळकत असतात. वर्षानुवर्ष सगळीकडे हीच परंपरा पाळली जात असते. मात्र गावातून गुणवंत विद्यार्थी घडावे, गावाचे नाव देशाच्या नकाशावर झळकावे यासाठी आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी अनोखी सूचना मांडली. त्यानुसार समस्त गावकऱ्यांनी ह्या ऐतिहासिक सूचनांचे स्वागत केले. ह्यावर्षी गावातील ध्वजारोहणाचा मान सैनिक प्रभाकर तारगे यांना देण्यात आला. आयुष्यात पहिल्यांदा हा सन्मान मिळाला असल्याचे प्रभाकर तारगे यांनी सांगितले. मोडाळे गावकऱ्यांच्या निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात स्वागत होत असून अनेक गावे असाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.