इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
योग्य लोकप्रतिनिधी आणि चांगल्या माणसावर विश्वास ठेवला तर गावाला बदलून टाकण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. लोकांच्या मनातल्या विश्वसनीयतेला आपलं मानून तो लोकप्रतिनिधी सुद्धा १२ महिने २४ तास गावासाठी झपाटून कामे करतो. असेच कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी मोडाळे गावाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवले आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून मोडाळे गावाने आधीच राज्यात अव्वल स्थान मिळवून गौरव मिळवलेला आहे. रोटरी क्लब नाशिक, लायन्स क्लब मुंबई यांच्या सहकार्याने माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी मोडाळे येथील ९ शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. ह्या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे विजेची स्वयंपूर्णता मिळणार असून भारनियमनाचे दुखणे संपणार आहे. विजेच्या बिलात सुद्धात बचत होणार असून गावाचे उत्पन्न वाढणार आहे. यासह राष्ट्रीय कार्याला मोठा हातभार लागणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे हे गाव विजेच्या बाबत स्वयंपूर्ण होणारे पहिले गाव यानिमित्ताने ठरणार असल्याचे गोरख बोडके यांनी सांगितले. तालुक्यातील गावांनी आदर्श घ्यावा असेही ते म्हणाले.
रोज लागणाऱ्या विजेपैकी 80 टक्के विजेची निर्मिती घराच्या अथवा इमारतीच्या छतावर करता येते. विजेची बचत आणि पैशांची बचत यामुळे होते. वाढत्या उन्हामुळे इमारत गरम होऊन परिसरात वाढणारे तापमान थांबवायला साहाय्य होते. ऊर्जेबाबत आपले मोडाळे गावाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार रोटरी क्लब नाशिक, लायन्स क्लब मुंबई यांच्या माध्यमातून त्यांनी कामांना सुरुवात केली. अंगणवाडी इमारत, सामाजिक सभागृह यामध्ये प्रत्येकी २ युनिट, जिल्हा परिषद शाळा, अभ्यासिका, आरोग्य उपकेंद्र, माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय ह्या इमारतींवर प्रत्येकी १ युनिट असे ९ सौरऊर्जा युनिट बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्माण होणारी वीज या इमारतीमध्ये वापरली जाईल. दिवसभरात गरजेपेक्षा अधिक निर्माण होणारी वीज कंपनीला विक्री केली जाणार आहे. हा प्रयोग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील भार कमी करणारा आहे. आपणच आपल्याला लागणाऱ्या विजेची निर्मिती करतो, हा अनुभव मनस्वी समाधान देणारा आहे. सौर ऊर्जेमुळे इमारतीवर ऊन पडत नसल्याने इमारतीमधील तापमान कमी राखण्यास मदत होते. यासह इमारतीचे आयुष्यमान वाढते. वीज कंपनीकडे विजेचा तुटवडा असल्याने लोकांना भारनियमनाला तोंड द्यावे लागते. सौर ऊर्जेच्या वापराने वीज कंपनीवरील आपला भार कमी होतो. आपल्याला खात्रीशीर वीज मिळते असे यावेळी सांगण्यात आले.
विजेची टंचाई, वाढणारी बिले, भारनियमन आदींमुळे नागरिक कंटाळलेल्या अवस्थेत आहेत. अशा परीस्थितीत माझ्या मोडाळे गावासाठी सौरऊर्जेचे ९ युनिट बसवणार आहे. पैशांची बचत आणि विजेची स्वयंपूर्णता होतांना गावाचे उत्पन्न वाढून विजेचीही बचत होणार आहे. इगतपुरी तालुक्यातील गावांनी ह्या उपक्रमाचा आदर्श घ्यावा.
- गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य