खासदार हेमंत गोडसे यांचे कार्य अभिनंदनीय आणि अतुलनीय : घोलप ; गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ४ ट्रक भरून ४५ टन जीवनावश्यक वस्तु चिपळूणला रवाना

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

कुणाच्याही मदतीला धावून जाणे, गरजूंना मदत करणे, समाजातील दीन-दुबळ्यांची मनापासून सेवा करणे तसेच समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे हा समाजसेवेचा वसा खासदार हेमंत गोडसे यांनी पुरेपूर पाळला आहे. खासदार गोडसे करत असलेेली समाजाची सेवा अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार माजी समाजकल्याण मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी काढले. दरम्यान चिपळूण येथे आलेल्या महापुराने व्यथित झाालेल्या खासदार गोडसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्वच कार्यक्रमांना फाटा देत ४ ट्रक भरून ४५ टन गृहोपयोगी व जीवनावश्यक वस्तु आज चिपळूणवासियांसाठी संसरीतून रवाना केल्या.

येत्या मंगळवारी खासदार गोडसे यांचा वाढदिवस आहे. संसदीय अधिवेशन सुरू असल्याने खासदार गोडसे मंगळवारी नाषिक येथे नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या जन्मगांवी संसरी येथे अतिशय साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी शिवसेना नेते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत गांवातील मंदिरात खासदार गोडसे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपनेते बबननाना घोलप, हभप रामकृष्णदास महाराज लहवितकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ताजी गायकवाड, माजी आमदार योगेश घोलप, वसंत गिते, विनायक पांडे, सुनिल बागुल, प्रशांत दिवे, आर. डी. धोंगडे, जगदीश गोडसे, केशव पोरजे, जयश्री खर्जुल, उत्तम कोठुळे, योगेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करून चिपळूणवासियांसाठी भरीव मदत पाठविल्याने यावेळी दत्ताजी गायकवाड यांनी खासदार गोडसे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी हभप लहवितकर महाराज यांनी भगवतगीता ग्रंथ खासदार गोडसे यांना सप्रेम भेट म्हणून दिला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वचजण खासदार गोडसे यांना त्यांच्या कार्याच्या रूपाने ओळखत आहोत. खासदार गोडसे यांची समाजसेवा करण्याची पद्धत सर्वसामान्यांपासून सर्वच नेत्यांना भावत असल्याने आज त्यांचा सर्वत्र मोठा लौकिक आहे. ते सर्वसामान्यांची करत असलेली सेवा निश्चितच अभिनंदनीय असल्याचे सांगत यावेळी घोलप यांनी गोडसे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

छोटेखानी कार्यक्रमानंतर गहु, तांदुळ, तेल, साखर, चहा पावडर, कांदे, बटाटे, पोहे, तुरदाळ, बिस्कीटे, पाण्याच्या बाटल्या, कपडे आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तुंनी खचाखच भरलेले ४ ट्रक चिपळूण वासियांसाठी संसरी येथून रवाना करण्यात आले. ‘‘माझा वाढदिवस महत्त्वाचा नसून समाजसेवा अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या सर्वांच्या आणि तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेले पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आम्ही चिपळूण वासियांसाठी छोटी मदत पाठवित आहोत. या मदतीचा चिपळूण वासियांनी स्विकार करावा. यापुढेही गरज पडल्यास चिपळूण वासियांना कधीही मदत करण्यास आम्ही सदैव तत्परच असू‘‘ असे भावनिक उद्गार यावेळी खासदार गोडसे यांनी काढले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!