इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधील गोवंश जनावरांचे चोरीचे प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार व पोलीस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई येथुन एका गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथील दुग्धव्यावसायिक संदीप गेणु गुळवे पशुपालकाच्या गोठ्यात बांधलेल्या ५ गाईंना अज्ञात चोरट्यानी सोडून नेत त्यांची कत्तल करण्यात आल्याची संतापदायक घटना चार दिवसापुर्वी घडली होती. यावेळी पोलिसांनी पंचनामा करीत पुढील कारवाईला सुरुघात केली होती.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 अ व 9 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाप्रमाणे मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, सपोनि पाटील, पोलीस हवालदार संदीप हांडगे, तुषार खालकर, निलेश मराठे यांच्या पथकाने गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषणचा आधारे मेहनत व चिकाटीने प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणला. ह्या गुन्ह्यातील आरोपी मोहंमद समीर नजीम शेख, वय २७ वर्ष, राहणार अमृतनगर, मुंब्रा, ठाणे यांस अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन स्विफ्ट डिझायर गाडी MH 02,CR- 3016 ही जप्त करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, संदीप गेणु गुळवे यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात सर्व गायी नेहमी प्रमाणे बांधल्या होत्या. पहाटे गायींना चारा टाकण्यासाठी ते उठले असतांना त्यांना गायींचे मांस, डोक्याची शिंगे व पायांचे अवशेष इतरत्र पडलेले आढळले होते. हे सर्व पाहून त्यांना भोवळ आली. त्यांना पाहून चोरट्यांनी कोयता, भूल दिलेल्या इंजेक्शनचे रिकामे सिरिन्ज एका गायीचे प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केलेले मांस व भूल दिलेली जीवंत गाय तशाच अवस्थेत टाकून पळ काढला. तेवढ्यात स्वतःला कसेबसे सांभाळत त्यांनी आरडाओरडा केला असता गावातील लोक गोळा झाले. जमिनीवर पडलेला रक्ताचा सडा, छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडलेले गायींच्या शरीराचे अवशेष त्याच बरोबर गाभण गायींच्या पोटातील चार-सहा महिन्याची रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वासरांचे दोन अभ्रके सर्व पाहून जीवाचा थरकाप होणारी व तितकाच संतापदायक प्रकार पाहून ग्रामस्थ आक्रमक झाले होते. या घटनेनंतर पोलीसांनी तातडीने कारवाई करत पोलीस पथकाची नेमणुक केली होती. आज त्यांना गुन्हा उकलण्यात यश आले असुन गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध सुरु असून वाडीवऱ्हेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार व पोलीस पथक पुढील तपास करीत आहे.