
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
मराठी भाषेची संस्कृती व इतिहास जतन करण्यासाठी आपली मातृभाषा जतन करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा, साहित्याचा इतिहास आणि परंपरा उज्ज्वल असून नव्या पिढिला याचा परिचय होणे आवश्यक आहे. यासाठी मराठी भाषा संवर्धन व विकास यासारख्या उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने विशेष व्याख्यान उपक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, आयोजक प्रा. आर. डी. शिंदे, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. अर्चना पाटील, प्रा. मीना जोशी उपस्थित होते. प्राचार्य भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की समाज माध्यमातील वापरल्या जाणाऱ्या भाषेमध्ये विद्यार्थी, युवकांनी मराठी भाषेचा आवर्जुन वापर करावा. मराठी भाषेच्या संवर्धन व विकासात हातभार लावावा. प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी आपल्या भाषणात म्हणाले की मराठी भाषेला २ हजार वर्षांपासूनची उज्ज्वल परंपरा व इतिहास असून मराठी भाषा ज्ञानभाषा होणे गरजेचे आहे. याप्रसंगी प्रा. गिरी यांनी मराठी साहित्यातील उत्कृष्ट साहित्यकृतींची माहिती दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या निमित्ताने प्रश्नमंजूषा स्पर्धा, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, मराठीतून सही उपक्रम, ग्रंथप्रदर्शन ह्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. आर. डी. शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. सी. पाटील व प्रा. अर्चना पाटील यांनी केले. आभार प्रा. मीना जोशी यांनी मानले.