पहिलवान बाळू जुंदरेची पुन्हा एकदा गगनभरारी ; राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया स्पर्धेत झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द गावातील गुणवंत पहिलवानाने पुन्हा एकदा आपल्या गावासह इगतपुरी तालुक्याचे नाव उंचावले आहे. कुस्ती या खेळाच्या माध्यमातून आपले कौशल्य आणि गुणवता त्याने सिद्ध केली आहे. देशभरात नामवंत झालेला पहिलवान कु. बाळू शिवाजी जुंदरे याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यशाचे शिखर गाठले.
नुकत्याच उत्तरप्रदेशातील नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील आखाडा आपल्या कुस्तीच्या डावपेचांनी बाळू जुंदरे याने गाजवला. देशाच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या नामवंत स्पर्धक पहिलवानांना चितपट करत बाळूने त्यांना अस्मान दाखवले. बाळू जुंदरे याने राष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. आहे. या गुणवत्तापूर्ण कामगिरीच्या जोरावर देशपातळीवर आयोजित केल्या जाणार्‍या खेलो इंडिया स्पर्धेसाठी पहिलवान बाळू जुंदरे याची निवड झाली आहे. या निमित्ताने भरविर खुर्द, गुरु हनुमान आखाडा साकूरफाटा येथील गावकऱ्यांसह अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नैपुण्याने हे यश मिळाल्याने त्यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. बाळूचे या गगनभेदी यशासाठी बालभैरवनाथ फाऊंडेशन भरविर खुर्द तर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या.