इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
राज्यभरात कोरोना संसर्ग पुन्हा जोर धरू लागला आहे. नागरिकही बेभानपणे नियमांची पायमल्ली करीत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी कठोर निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. यासह मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनीही नुकतेच नव्याने निर्बंध लागू केले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी, वाडीवऱ्हे, घोटी हे तीन पोलीस ठाणे सतर्क झाले आहेत. नियमांचा भंग करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, वाडीवऱ्हेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार, घोटीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले आहे.
क्रिकेट व विविध स्पर्धा, सामाजिक गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभ, भव्य समारंभ, गर्दी होणारे सोहळे, सार्वजनिक वाढदिवस ह्या कार्यक्रमांना निर्बंध लागू असून त्यासाठी उचित नियमावली आणि किमान उपस्थितीचे बंधन लागू आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 144 कलम लागू केले आहे. ह्या वेळेत अत्यावश्यक काम वगळता लोकांनी विनाकारण फिरू नये किंवा ये जा करू नये. विवाह आणि सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय मेळावे फक्त 50 लोकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेले आहेत. शाळा महाविद्यालय व कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. रेस्टॉरंट, भोजनगृहे रात्री 10 वाजता बंद होतील. स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील. कार्यालय प्रमुखांच्या परवानगीशिवाय सरकारी कार्यालयांना भेटी देऊ नये. खाजगी कार्यालयांना वेळेचे बंधन आणि उपस्थिती 50 पेक्षा जास्त ठेवू नये. हेअर कटींग ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. हेअर कटिंग सलून रात्री 10 ते सकाळी 7 बंद राहतील. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक आहे. किल्ले पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे.
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य शासनाने निर्देशित केलेल्या नवीन नियमावली १० जानेवारीपासून लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नाशिक जिल्हा पोलीस प्रशासनाने आखलेली कडक निर्बंध मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर व उपस्थितांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, वाडीवऱ्हेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार, घोटीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिला आहे.