लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – विद्यार्थ्यांना सुसंस्काराने घडवण्याचे महत्वपूर्ण काम शाळा करीत असते. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नूतन इमारत बांधली जात आहे. यामुळे अध्ययन, अध्यापन करणे सोपे होणार असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यास मोठी मदत मिळणार आहे. म्हणूनच नवीन शाळेच्या इमारतीचे काम अधिकाधिक सुंदर करण्यावर आमचा कायमच भर राहील. असे प्रतिपादन संचालक विशाल गाडेकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे एचएएलच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या सुसज्ज नूतन इमारतीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. शालेय समिती आणि ग्रामस्थांनी पाहणी करीत ह्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी संवाद साधताना विशाल गाडेकर बोलत होते.
विशाल कन्ट्रक्शनचे निवृत्ती गफले यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल शाळेसारखी भव्य शालेय इमारतीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. ११ महिन्याच्या कालावधीत ही इमारत पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यास इमारत सोईस्कर ठरणार असल्याचे श्री. गफले यांनी सांगितले. खासदार हेमंत गोडसे यांनी मागील महिन्यात शाळा इमारतीचे भूमिपूजन केले होते. अभियंता संदीप रांधव यांनी कामाकडे विशेष लक्ष घातले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे काम वेगात सुरू असल्याचे विशाल कन्ट्रक्शनचे संचालक विशाल गाडेकर यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे तालुका निरीक्षक तथा शालेय समिती अध्यक्ष दादाभाऊ शिरसाठ, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकर, शालेय समितीच्या महिला यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.