कवी – प्रा. अरूण सु.पाटील ( असु )
गतवर्षाची रे विसरा बात
नववर्षाची करुया सुरुवात
ओलांडता परि उंबरठ्यावर
जरा विसावू या वळणावर
सुखानंतर उभे दुःख सत्वर
असते आयुष्य रोलर कोस्टर
जगणे नसावे कण्हत कण्हत
जगा आनंदाने गाणे म्हणत
‘दुर्दैव केवळ माझ्याच पाठी’
वाटणे सर्वांना ही जगरहाटी
दुर्दैवाच्या ह्या शृंखला तोडुनी
लढत राहू ताठ जगण्यासाठी
आयुष्याने काय दिले मज?
प्रश्न नका विचारू भोळसर
आयुष्यास मी काय देऊ?
उत्तर द्यावे होऊन कणखर
वाईट साईट विसरून जाऊ
नववर्षाच्या नव वळणावर
आनंदे करू आपण स्वागत
आव्हान देऊ या वळणावर
कविता संकलन : प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर