इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक आणि गिर्यारोहकांना प्रिय असणाऱ्या त्रिंगलवाडी किल्ल्याला संरक्षक स्वरूप देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक व सह्याद्री प्रतिष्ठान, शहापूर, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि इगतपुरी तालुक्यातील दुर्गप्रेमी युवक झपाटून गेले आहेत. हा किल्ला २ हजार ९०० फूट उंच असून चढाईला अतिशय खडतर आहे. मात्र एवढ्या मोठ्या उंचीवर 1 हजार किलो वजनाचा सागवानी दरवाजा युवकांनी वाहून नेला आहे. सळसळत्या रक्ताच्या दुर्गप्रेमी तरुणाईने कड्या कपारीतून त्रिंगलवाडी किल्ल्यावर हा दरवाजा नेऊन पोहोचवला. आज पहाटे साडेसहा वाजेला या अभियानाला सुरवात झाली. दुपारी 1. 30 च्या सुमारास हा दरवाजा किल्ल्यावर बसवण्यात आला. किल्ले त्रिंगलवाडी प्रवेशद्वार असे अभियानाचे नाव आहे. हा १ हजार किलो वजनाचा दरवाजा वाहून नेण्यासाठी ६० युवकांचे योगदान लाभले.
१ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त किमतीचा हा दरवाजा असून यासाठी युवकांकडून स्वखर्चातील रक्कम जमा करण्यात आली. यासाठी लोकवर्गणी सुद्धा जमवण्यात आली. ह्यातून किल्ल्यासाठी हा सागवानी दरवाजा निर्माण करण्यात आला. याची उंची 8.5 फूट×3.4 फूट असून 1000 किलो वजन असलेला सागवान लाकडापासून बनवला गेलेला दरवाजा आहे. ह्या मोहिमेत नाशिक, शहापूर, मुंबई, संभाजीनगर, अंबरनाथ, स्थानिक गावकरी असे सर्व ६० दुर्गसेवक उपस्थित होते. उपस्थित सर्व दुर्गसेवकांचे सर्वत्र प्रचंड कौतुक केले जात आहे. दरवाज्याचा बुरुजार्पण सोहळा 19 डिसेंबरला त्रिंगलवाडी किल्यावर उत्साहात संपन्न होणार आहे. “आम्हा तरुणाईला वेड शिवरायांच्या इतिहासाचे व दुर्ग संवर्धनाचे” असा जयजयकार करून मोहीम संपन्न झाली.