इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
मानव विकास परिषदेच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्षपदी दहेगाव येथील शितल रहाडे यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष अफसर शेख आणि महिला प्रदेशाध्यक्षा जयश्री आहीरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्धल सर्वच स्तरातून शितल रहाडे यांचे अभिनंदन होत आहे.
शोषित श्रमिकांचा पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, दहशत,मागासवर्गीयांवर होणारा अन्याय, सरकारी कार्यालयातुन गोरगरीबांवर होणारा अन्याय, मानवी हक्काचे उल्लंघन, शासकीय अधिकाऱ्यांकडून अधिकाराचा दुरूपयोग, भांडवलदार व सत्ताधाऱ्यांकडुन शासकीय यंत्रणेचा होणारा गैरवापर हे समुळ नष्ट करून सर्वसामान्याचे संविधानिक मानवी हक्क मिळवून देण्यासाठी, गोरगरीबांना न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी संस्था कार्यरत आहे. ह्या संस्थेच्या पदावर ग्रामीण भागातुन होतकरू युवा नेतृत्व शितल रहाडे यांची निवड झाल्याने दहेगाव व वाढोली येथे स्वागत करण्यात आले.
शितल रहाडे उर्फ जयश्री महाले यांचे शिक्षण विद्या प्रशाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तळेगाव अंजेनरी येथे झाले. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याचे लग्न झाले परंतु त्यांनी जिद्दीने व कष्टाने ग्रामीण भागात राहत असतांना त्याचे पती व सासु सासरे यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. लग्नानंतर पाच वर्षानंतर महाविद्यालयीन शिक्षणास सुरूवात करून यश संपादन केले. गृहिणी असताना शिक्षण पुर्ण केल्यानंतर इतर महिलांना आदर्श उभा केला आहे. या अगोदर रहाडे यांनी आरोग्य क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आपल्या संघटन कौशल्यातून शितल रहाडे यांनी सन 2005 सालच्या सर्व मित्र मैत्रिणींना एकत्र आणले. लवकरच सामाजिक जाणिवेतून विधायक कार्याची सुरुवात करणार आहे असे त्या म्हणाल्या.