इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
इगतपुरी तालुका कोरोनामुक्त झाला असतानाच मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. ह्या शालेय विद्यार्थ्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळवण तालुक्यातील एका विद्यार्थ्याला किरकोळ लक्षणे जाणवत असल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ह्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर १५ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. ह्या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी उपचार करण्यासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आश्रमशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी भेट देऊन वैद्यकीय पथकाला सूचना केल्या. वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कामगार, येणारे जाणारे नागरिक आदी ३४० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली. आरोग्य सहाय्यक तानाजी अहिरराव, वैज्ञानिक अधिकारी कावेरी ढिकले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री घरटे, आरोग्य कर्मचारी संजय राव आणि आशा कार्यकर्त्या यांच्या पथकाने रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.