कवितांचा मळा – नूतन वर्षाभिनंदन २०२३

कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर

गतकाळातील चुका
विसरुया आपण सारे
नव संकल्प, नवा ध्यास
उडवू आनंदाचे वारे

हृदयातील कप्प्यात
जागा देऊ आपुलकीची
अनावर राग, द्वेष, मत्सर
तयारी असावी दूर सारण्याची

खंत नको बाळगायची
आता सर्व एकजुटीने राहू
करुनी परिवर्तन आपल्यात
आशेचा किरण नव्याने पाहू

सुख दुःख घेऊ वाटून
मनी असावी नवी उमेद
स्वप्नतरंगात रंगून जाऊ
नको कसलाही मनी खेद

नवी स्वप्न, नव्या आशा
धरू नाविन्याची कास
नव वर्षाचे स्वागत करू
बनवू प्रत्येक दिवस खास

नवी दिशा, नवे क्षितीज
घेऊ गगनी उंच भरारी
न खचता जिद्द असावी
ह्यातच असते मजा खरी

सर्वांना नववर्षाभिनंदन
हार्दिक हार्दिक शुभेच्छा
नव्या उमेदीने पूर्ण व्हाव्यात
आपण सर्वांच्या इच्छा

error: Content is protected !!