इगतपुरीकरांच्या आक्रमक आंदोलनापुढे अखेर प्रशासन झुकले : २ दिवसात रस्त्यांचे काम होणार आणि मृताच्या वारसाला भरपाई देण्याचा दिला शब्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

काल इगतपुरी शहरातील खड्ड्यांमुळे  बिबळेवाडी येथील एक युवकाचा बळी गेला. त्यामुळे संपूर्ण इगतपुरी शहरातील नागरिक संतप्त झाले. आज आक्रमक झालेल्या नागरिकांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन २ तास चालले. ह्या आंदोलनात इगतपुरीकरांनी एकजूट दाखवून प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली. यामध्ये मृत युवकाचे नातेवाईकही सहभागी झाले होते. आगामी २ दिवसात इगतपुरी शहरातील रस्त्यांचे युद्धपातळीवर काम हाती घेण्यात येईल. यासह मृत युवकाच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन वरिष्ठ अभियंता सीमा जाधव यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्याची नेहमीच चाळण झालेली असते. सर्व पक्षांनी व संघटनांनी अनेकदा या रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन आंदोलनसुद्धा केले. मात्र आज पर्यंत आश्वासनाशिवाय पदरात काहीही पडले नाही. त्यातच काल रात्री खड्ड्यात वाहनाचे टायर अडकून झालेल्या अपघातात एका निष्पाप युवकाचा बळी गेला. म्हणून संतापलेल्या सर्वपक्षीय व संघटनांनी एक इगतपुरीकर म्हणून 2 तासांपासून रास्ता रोको केला. यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी विलंबाने पोहोचल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. आंदोलनकर्ते अजूनच आक्रमक झाल्याने आंदोलनाला पाठिंबा मिळाला. यापुढेही इगतपुरीकर नागरिक जागरूक राहून अन्यायाविरोधात लढा देतील अशी एकात्मता उभी राहिल्याने तालुकाभर कौतुक केले जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!