इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या व नाशिकमधील महिला शिक्षण व सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांचे आज ३० नोव्हेंबरला दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. संस्थेचे सचिव व डायरेक्टर जनरल डॉ. मो. स. गोसावी ह्यांच्या त्या पत्नी व संस्थेच्या एचआर डायरेक्टर व एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या त्या मातोश्री होत.
एमए, पीएच. डी. मराठी साहित्य विशारद, संगीतरत्न असलेल्या प्रा. डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांनी गृहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतांनाच शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. जिज्ञासा महिला महाविद्यालय, नाशिक येथे १९७५ पासून दहा वर्षे त्या मानद प्राध्यापक व संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर १९८५ पासून एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक येथे संस्थापक प्राचार्य म्हणून बारा वर्षे त्यांनी काम पाहीले. मार्गदर्शक, उत्कृष्ट अध्यापक कुशल नेतृत्व व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाची तळमळ हे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत. “प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे वाड्:मयाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर मराठीत संशोधन ( पीएचडी) केले आहे. ह्याच विषयावर त्यांचा ग्रंथ कै. डॉ. वि. ग. भिडे, माजी कुलगुरु, पुणे विद्यापीठ ह्यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. महिला सक्षम व स्वयं-रोजगारी व्हाव्या म्हणून एसएनडीटी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण वर्ग माध्यमातून दरवर्षी ३०० महिलांना बीए वर्गाचे मार्गदर्शन सतत १० वर्षे विना मानधन केले. कला-वाणिज्य- गृहविज्ञान, ललित याबरोबर संगीत, संगणक, परिचर्या, विज्ञान, मानवविकास, आहारशास्त्र, कला, वस्त्रोद्योग, विणकाम, कुटुंबा- गदा- व्यवस्थापन यातील पदवी- पदविका अभ्यासक्रमाची उत्तर महाराष्ट्रात प्रथम सुरुवात करून दरवर्षी २०० विद्यार्थिनांना उद्योजक अविण्यास पायाभूत कार्य व यशस्वी मार्गदर्शन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. महिलांच्या व्यक्तित्व विकासासाठी स्वानंद भजनी मंडळाची स्थापना केली.
पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान, नाशिक १९७९ स्थापनेत सहभाग या ‘संस्काराचे विद्यापीठ’ माध्यमातून ३०० समाज-सेवाव्रती दाम्पत्यांची अनुबंधी परिवार निर्मिती. स्वास्थ्यपूर्ण जीवन व समाज प्रबोधन सात्त्विक प्रकाशने, आध्यात्मिक उपक्रमात त्यांचे विशेष योगदान होते. दिल्ली येथील आयबीएस संस्थेकडून ‘आदर्श महिला’ पुरस्कार.
गोखले एज्युकेशन सोसायटी : ‘आदर्श प्राध्यापिका’पुरस्कार
इंडिया इंटरनॅशनल सोसायटी : शिक्षणरत्न पुरस्कार असे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. उद्या बुधवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता द्वारका येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.