सीईओ बनसोड मॅडम, कृपया याकडे लक्ष घालावे : नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात कारवायांसाठी दिरंगाई वाढल्याने भ्रष्ट्राचार फोफावला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतींच्या कामकाजा विषयी अनेक तक्रारी होत असतात. इ ग्राम स्वराज ॲपच्या माध्यमातून तरुण सुशिक्षितांकडून आपल्या गावांमध्ये कोणकोणत्या योजना, त्यांचे आराखडे, सद्यस्थिती व झालेला खर्च मोबाईल व इतर माध्यमातून सहज बघतात. त्यातून अनेक कामे फक्त कागदोपत्री केल्याचे दिसून येते. त्यातून जागृत नागरिक ग्रामपंचायत कामकाजाची तक्रार पंचायत समितीकडे करतात. त्यातून चौकशी होऊन कारवाई साठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे प्रस्ताव पाठवले जातात. आदिवासी भागात तर पेसा व वित्त आयोग यांच्या कामकाजात अनियमितता झाल्याच्या अनेक तक्रारी होत असतात. अनेक गंभीर विषय ग्रामपंचायत विभागात मुद्दाम धूळ खात पडल्याने त्यावर कारवाई होत नाही. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तत्परतेने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मध्यंतरीच्या काळात अनेक ग्रामसेवकांवर तडकाफडकी कारवाई केली. पण बऱ्याच ठिकाणी तक्रारींचा अनुषंगाने चौकश्या होऊन व त्यात मोठ्या प्रमाणात अपहार व अनियमितता असून देखील ग्रामपंचायत विभागात प्रस्ताव प्रलंबित आहेत. किंबहुना अनेक तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे हेतुपूर्वक काही कारवाईचे प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहेत. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणात अनियमितता व अपहार असूनही किरकोळ स्वरूपात कारवाईसाठी प्रस्ताव देऊन दुर्लक्षित करत आहेत अशी चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

एकंदरीत विचार करता बऱ्याच बाबीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची शंका अनेक तक्रारदार करत आहेत. अनेकदा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत ग्रामपंचायत विभागाकडुन ग्रामपंचायत तक्रारींचे बरेच विषय जात नाहीत अशी शंका उपस्थित केली जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामपंचायत विभागाचा बारकाईने आढावा घेऊन याविषयी नागरिकांच्या तथ्य असलेल्या तक्रारींवर कारवाई करावी अशी तक्रारदार नागरिकांची अपेक्षा आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!