लेखन : भास्कर सोनवणे : मुख्य संपादक, इगतपुरीनामा
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया अद्याप प्रलंबित असतांना मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात १ किंवा २ गट आणि ४ किंवा ५ गण वाढणार असल्याचा अंदाज आहे. यासह गट गणांची पुनर्रचना आणि गावांच्या अदलाबदलीची प्रक्रिया सुद्धा होणे अनिवार्य झाले आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र राजकीय आरक्षणाचा गोंधळ अधिकाधिक वाढीला लागला असून नुसता गोंधळच गोंधळ सुरू झाला आहे. निवडणुका लढवणाऱ्या इच्छुकांना सुद्धा आपल्या कोणत्याही कामांना यामुळे मुहूर्त मिळत नाही. परिणामी गट गणांची संख्यावाढ, गावे अदलाबदल आणि राजकीय आरक्षणाचा गोंधळ यामुळे संभ्रमात दिवसेंदिवस वाढ होतेय.
इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी आरक्षणाची प्रक्रिया अद्यापही अनिर्णित आहे. गेल्या २ महिन्यांपासून राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार आरक्षणाचा गोंधळ आणि अफवा यांनी हैराण आहेत. रोजच विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज गट आणि गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सगळ्या गोंधळात अजूनच भर पडली आहे. वाढलेल्या गट आणि गणांमुळे राजकीय आरक्षणावर मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.
नव्या निर्णयानुसार इगतपुरी तालुक्यात १ किंवा २ गट आणि ४ किंवा ५ पंचायत समितीचे गण वाढणार असल्याचा अंदाज आहे. गट आणि गण वाढल्यावर अजून काही लोकांचे राजकीय स्वप्न आणि राजकीय स्पर्धा कमी होण्यास मदत होणार असली तरी सदस्य संख्या वाढवण्याचा फटका राजकीय आरक्षणाला बसणार असल्याचे बोलले जात आहे. आरक्षणाचे नवे नियम येण्याच्या धास्तीने संभ्रमात भर पडली आहे. आगामी काळात ह्यामध्ये जास्तच भर पडण्याचे प्रकार अफवांच्या माध्यमातून वाढू लागणार आहेत. संभाव्य आरक्षणाच्या संभ्रमाने राजकीय पक्षांमध्ये आणि इच्छुकांमध्ये उलथापालथ सुरू झाल्याने येणाऱ्या काळात लोकांमधील गोंधळ काढण्याची कसरत करावी लागणार आहे. येणाऱ्या काळात लोकांमधील गोंधळ कमी व्हायला प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा आहे.