वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
केंद्र सरकारने भाताचा भाव १९४० रुपये प्रति क्विंटल भाव घोषीत केला आहे. मात्र अद्याप पर्यंत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथे भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. राज्य सरकार कडुनही अद्याप अनुदान बोनस घोषित करण्यात आलेला नाही. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या आदिवासी विकास महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, भाताचा हंगाम संपत आला असुनही बाजारपेठेत भात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही. याबाबत सरकारकडुन योग्य तो प्रचार प्रसार न झाल्याने गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रकल्प संचालक म्हणुन येत्या 8 दिवसात धान खरेदी केंद्र सुरू करावे. असे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आदिवासी विकास विभागीय कार्यालयावर मनसे स्टाईलने आक्रमक आंदोलन करण्यात येईल. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, रामदास आडोळे, जिल्हा संघटक भगीरथ मराडे, उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, अभिजित कुलकर्णी, शत्रुघ्न भागडे, गणेश उगले, आत्माराम मते, प्रताप जाखेरे, पिंटु चव्हाण, निलेश जोशी, जनार्दन गतीर, राज जावरे, अंकुश गतीर, समीर गोलंदाज आदी उपस्थित होते.