नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या मागणीचे यश
सुभाष कंकरेज, इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता व ५ महिन्याच्या फरकाच्या सर्व रक्कमा दसरा दिवाळीपुर्वी मिळाव्यात यासाठी नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन नाशिक यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी संघटनेने निवेदनाद्वारे गाऱ्हाणे मांडले होते. ह्या मागणीला यश मिळाले आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी ११ टक्के महागाई भत्ता व मागील पाच महिन्यांचा फरक मंजूर करण्यात आला आहे. याबाबत शासनाने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट दिली आहे.
नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन,नाशिकचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, सुभाष कंकरेज यांनी शासनाचे आभार मानले आहेत. राज्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या संघटनांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री ना अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शासनाने स्वतंत्र आदेश पारित केले आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी शासनाचे आभार मानले आहेत.